पुणे – महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रिया ठराविक ठेकेदारांच्या हितासाठी राबवल्या जात आहेत. त्यासाठी भाजपकडून प्रशासनावर दबाब टाकला जात आहे. आर्थिक नुकसान करणाऱ्या तसेच चुकीच्या पद्धतीने राबलेल्या निविदा तातडीनं रद्द कराव्यात, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने आयुक्तांकडे केली आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते आबा बागूल यांच्यासह नगरसेवक यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर आदी यावेळी उपस्थित होते. बागूल म्हणाले, “शहरावर करोनाचे संकट असताना; महापालिका प्रशासनाने निविदांचा बाजार मांडला आहे. त्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात येत आहे. प्रशासनाही ठेकेदरांना फायद्याचेच निर्णय घेत आहे.
यामध्ये सुरक्षारक्षक पुरवणे, जलपर्णी काढणे, नाले तसेच ड्रेनेज सफाई, देखभाल-दुरुस्ती कामांच्या निविदांचा समावेश आहे. त्यामुळे आयुक्तांनी भाजपच्या दबावाखाली काम न करता तातडीनं या निविदा रद्द कराव्यात.’
बागवे म्हणाले, “चुकीच्या पद्धतीने केल्या जात असलेल्या या कामांबाबत तातडीने कारवाई करून या प्रकरणी खुलासा करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. शहराचे आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी आयुक्तांनी निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करून पुणेकरांसमोर महापालिकेचा कारभार मांडला जाईल. त्यानंतरही प्रशासन दबावाखाली काम करत असेल तर राज्य शासनाकडे तक्रार केली जाईल.’