पुणे : लंडनहून आला, थेट सोसायटीत राहिला

क्वारंटाइन न झाल्याने जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा दाखल

लोणी काळभोर (वार्ताहर) -लंडन येथुन पुणे येथे हवाई मार्गाने आल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार 7 दिवस हॉटेल क्वारंटाइन होणे आवश्‍यक आहे. तरीही एकजण सोसायटीत राहण्यास आला. या घातक कृतीमुळे करोना संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्‍यता आहे हे त्यास माहीत असताना देखील त्याने शासनाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाइन झाला नाही म्हणून दाखल झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे.

या प्रकरणी औंताडे हांडेवाडी ग्रामपंचायत (ता. हवेली) ग्रामविकास अधिकारी प्रगती उल्हास कोरडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतंर्गत करोना या विषाणूचे संसर्ग बाधित रूग्ण आढळत आहेत. हा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाच्यावतीने अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून परदेशातून नागरिकांनी भारतात आल्यानंतर शासनाने सुुुचवलेल्या हॉटेलमध्ये 7 दिवस तसेच स्वतःचे घरी 7 दिवस क्वारंटाइन राहून नियमांचे पालन करणेबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. बुधवारी (दि. 17) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील हॉटेल विलगीकरण कक्षाचे नोडल अधिकारी अजित सणस यांनी ग्रामविकास अधिकारी प्रगती कोरडे यांना समक्ष येऊन एकजण 16 जून रोजी लंडन येथून पुण्यात आला आहे.

नियमानुसार तो हॉटेलमध्ये क्वारंटाइन न होता हांडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका सोसायटीत राहण्यास आला. ही बाब समजताच प्रगती कोरडे तसेच पुणे मनपा येथील अधिकारी व कर्मचारी, हांडेवाडी ग्रामपंचायतचे पदाधिकारी असे सर्वजण सायंकाळी 4 वाजता संबंधित सोसायटीत पोहोचले.

त्यास हॉटेल क्वारंटाइन होणेस सांगितले. त्याने नकार दिला. त्यानंतर कोरडे यांना गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी प्रशांत शिर्के यांनी या व्यक्‍तिवर कारबाई करणेबाबत लेखी आदेश दिला. यानंतर ग्रामविकास अधिकारी प्रगती कोरडे यांनी ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.