पुणे – तुरळक तक्रारी वगळता शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत बुधवारी मतदान शांततेत पार पडले. सकाळच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेले मतदारांनी सकाळी शहरातील सर्वच मतदान केंद्रावर गर्दी आणि दुपारनंतर शहरातील सर्वच मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र पुण्यात पहायला मिळाले.
शहरात ३ हजार ४० मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडले. दरम्यान, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या वेळी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे या वेळी तरुणांची संख्या अधिक दिसून आली. मात्र, मतदानाची टक्केवारी २०१९ पेक्षा कमीच राहिली. तर, मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, ऊन लागू नये यासाठी घातलेला मांडव, बसण्यासाठी खुर्ची, बाकडी अशा सुविधा असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांंना कोणत्याही अडथळ्यांशिवाय मतदान प्रक्रियेत सहभाग घेता आला.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदार याद्यातील घोळ कमी असल्याने केंद्राच्या बाहेर गोंधळ कमी असल्याचेही दिसून आले. मात्र, काही वर्षांत वर्षानुवर्षे असलेली काही मतदान केंद्र बदलण्यात आल्याने अनेक नागरिकांना मतदान केंद्र शोधताना अडचणींचा सामना करावा लागला. तर खडकवासला, कसबा, कॅन्टोंन्मेंट मतदारसंघात काही ठिकाणी मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएम बिघडल्याचे निदर्शनास आल्यानंतर या मशिन तातडीने बदलत मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी सात वाजण्याच्या पूर्वीच मतदान केंद्राबाहेर रांग लावल्याचे चित्र कोथरूड, पर्वती, कसबा, शिवाजीनगर या मतदारसंघात दिसून आले. त्यानंतर मतदानाची टक्केवारी घटली. मात्र, दुपारी १२ नंतर ते मतदान संपेपर्यंत सगळ्याच केंद्रांवर मतदारांची चांगली गर्दी दिसून आली.
वस्ती भाग असलेल्या शिवाजीनगर, कसबा, पर्वती आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या काही केंद्रावर अचानक मतदारांची संख्या वाढल्याने त्या ठिकाणी सहा वाजण्यापूर्वी आलेल्या मतदारांनाच प्रवेश देण्यात आला. त्यामुळे उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
ठळक मुद्दे
– मतदार मदत केंद्रांचा फायदा
– राजकीय पक्षांच्या केंद्रावर स्लिप घेण्यासाठी गर्दी
– मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा
– सकाळी १० ते १२ मतदारांची संख्या रोडावली
– महिला, युवकांनी बजावला मतदानाचा हक्क
– नावे नसल्याच्या तक्रारी काही अंशी घटल्या
– मतदार यादीत नावातला गोंधळ वाढला.
– यादीत नाव, पण केंद्र बदल्याने मतदारांचा गोंधळ