पुणे – जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आमदार रवींद्र धंगेकर हा माणूस पोटतिडकीने लढला आणि त्यांच्या या कामाला नाटक असे संबोधून ज्येष्ठ भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची हेटाळणी केली आहे. त्यांची ही हेटाळणी सर्वस्वी गैर असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिले आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस, महाविकास आघाडीकडून धंगेकर हे उमेदवार असून, धंगेकर यांच्या प्रचारार्थ खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांची प्रचार फेरी काढण्यात आली. या वेळी ते बोलत होते. मोहन जोशी, अभय छाजेड, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, अण्णा थोरात, बाळासाहेब मारणे, संजय मोरे, विशाल धनवडे, गणेश नलावडे, अक्षय माने आदी याप्रसंगी उपस्थित होते.
ही फेरी लाल महालात माँसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन सुरू झाली. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती, असे पुढे जात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
डॉ. कोल्हे म्हणाले, की धंगेकर यांनी भरीव कार्याने आपली येथे ओळख निर्माण केली आहे. शहरातील अवैध पब्ज, मादक द्रव्यांचा पुणे शहराला पडत असलेला विळखा या महत्त्वाच्या प्रश्नांसह धंगेकर यांनी आमदारकीच्या दीड वर्षाच्या काळात लोकांच्या प्रश्नांवर तळमळीने काम केले आहे.
आमदारकीच्या १६ महिन्यांच्या काळात केलेल्या कामाची माहिती देतानाच यापुढील काळात अधिक जोमाने येथील जनतेच्या प्रश्नांबाबत काम करण्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्याला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन धंगेकर यांनी केले.