पुणे – सी-व्हिजिल ऍपवर 982 तक्रारी

774 तक्रारींचे निराकरण 100 मिनिटांत

पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांत सी-व्हिजिल ऍपवर नोंदविलेल्या 774 तक्रारींचे निराकरण 100 मिनिटांत करण्यात आले.
निवडणुकीच्या काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल ऍप उपलब्ध करून दिले आहे.

कोणताही गैरप्रकार आढळल्यास नागरिकांना दोन मिनिटांची चित्रफीत आणि छायाचित्र अपलोड करण्याची सुविधा या ऍपवर आहे. या ऍपवरून माहिती कळवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ऍपवर माहिती देणाजयाचे नाव आणि मोबाइल क्रमांक गुप्त राहतो. तक्रार कोणी केली आहे, हे भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही समजू शकत नाही.

नागरिकाने तक्रार नोंदविल्यानंतर पाच मिनिटांमध्ये ती तक्रार जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होते. तेथून ती माहिती भरारी पथकाकडे पाठवण्यात येते. संबंधित पथक 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचते. तक्रारीनंतर 30 मिनिटांत कारवाई करण्यात येते. तक्रार अपलोड झाल्यापासून 100 मिनिटांमध्ये तक्रारीची स्थिती तक्रार करणाऱ्या नागरिकाला समजत असून त्याबाबत मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवला जातो.

त्यानुसार आतापर्यंत सी-व्हिजिल ऍपद्वारे 982 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 829 तक्रारी योग्य होत्या. 774 तक्रारींवर 100 मिनिटांत कार्यवाही करून त्यांचे निराकरण करण्यात आले. सर्वाधिक तक्रारी अनधिकृत प्रचारफलक, बोर्ड, फ्लेक्‍स, होर्डिंग यांच्या आहेत. निवडणूक आचारसंहितेचे योग्यरीतीने पालन होत आहे किंवा कसे याची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथके नेमली आहेत. तसेच सी-व्हिजिल ऍपवरून आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.