पुणे –जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 21 डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) जागांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 317 ग्रामपंचायतींमधील 503 जागांवर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत आता 68 जागा वगळून निवडणूक घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकांतील इतर मागास प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याने जिल्ह्यातील 68 जागांवर निवडणूक होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. इतर मागास प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक ठरलेल्या कार्यक्रमानुसार घेण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.