पुणे – पीयूसी नसलेल्या बसेस कारवाईपासून दूरच

प्रदूषणास कारणीभूत बसेसवर कारवाई कधी होणार

पुणे – दुचाकी अथवा चारचाकी वाहनांच्या चालकांच्या परवान्याची तपासणी करताना वाहतूक पोलिसांच्या वतीने कागदपत्रे आणि पीयुसीची मागणी केली जाते. ही कागदपत्रे नसल्यास संबधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, धूर ओकत चाललेल्या बसेस, त्यामुळे होणारे प्रदूषण आणि त्यातून होणारे प्रदूषण ही पीएमपीएमएलच्या बसेसची नित्याचीच बाब झाली आहे. परंतु या बसेसवर अथवा प्रशासनावर वाहतूक पोलिसांच्या वतीने अद्याप कोणत्याही स्वरुपाची कारवाई झालेली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या भूमिकेच्या संदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

“पीएमपीएमएल’च्या ताफ्यात स्वत:च्या मालकीच्या 1600 आणि भाडेतत्वावरील 700 अशा 2300 बसेस आहेत. यातील बहुतांशी बसेस या पंधरा वर्षांपेक्षा जुन्या आहेत, त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार या बसेस ताफ्यातून बाद करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, प्रशासनाकडे बसेसची संख्या कमी असल्याने आणि प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेस मार्गावर नेण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओकडे करण्यात आली होती. त्यामुळे आरटीओच्या माध्यमातून त्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र, या बसेस मार्गावर आणताना त्या सुस्थितीत असाव्यात आणि त्यांची कागदपत्रे असावीत, अशी अट आरटीओच्या वतीने प्रशासनाला घालण्यात आली होती. ही अट प्रशासनाच्या वतीने मान्य करण्यात आली होती.

मात्र, हे वास्तव असतानाही पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने हे सर्व नियम धाब्यावर बसविल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या ताफ्यात असलेल्या स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्वावरील एकाही बसेसचे गेल्या काही वर्षांच्या कालावधीत पीयूसी प्रमाणपत्र काढण्यात आलेले नाही. त्यामुळे धूर ओकत चाललेल्या बसेसमुळे प्रदूषण वाढत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र, हे वास्तव असतानाही वाहतूक पोलिसांच्या वतीने या बसेस अथवा प्रशासनावर अद्यापही कोणत्याही स्वरुपाची कारवाई करण्यात आलेले नाही. यासंदर्भात पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून त्याबाबत लवकरच या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.