पुणे – बाणेर रोडवरील बस थांब्यांची दुरवस्था

प्रवाशांची गैरसोय : मुद्दाम बसथांबे तोडण्याचा प्रयत्न?

औंध – बाणेरहून विद्यापीठाकडे जाताना हॉटेल महाबळेश्वर जवळील पीएमपीएलच्या बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी जवळच व्यावसायिक इमारती तसेच रहिवासी इमारती व सोसायट्या आहेत. त्यातील नागरिक या बसथांब्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. बस थांब्यावर बसण्यासाठी असणारे बाकडे तुटल्यामुळे प्रवाशांना तासन्‌तास उभे रहावे लागते.

एक ते दीड महिन्यांपूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बस थांब्याच्या खुर्च्या व संरक्षक कठडा तुटून गेला होता. तरीही याकडे महापालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. बसथांब्याची दुरुस्ती करायचीच नाही का, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

बाणेरमधील एका राजकीय पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, या थांब्यांसह अजून तीन ते चार बस थांबे सध्या असलेल्या जागेवरून हटविण्यासाठी मुद्दाम तोडले जात आहेत. संबंधित जागेवर असलेले थांबे तेथून हलविण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणजे थांब्याचे तोडफोड करणे होय.

या जागेवर सुरक्षितता नसल्याचे सांगून ते हलवण्याचा प्रयत्न करणे हा यामागील हेतू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तरी पालिका प्रशासन हे थांबे आहे तेथेच ठेवणार की हलविण्याची भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. महामार्गापासून ते बाणेर फाट्यामधील पीएमपीएलचे काही थांबे हटविण्यासाठी हालचाली होत असल्याचेही या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.