जि.प.च्या सर्वसाधारण सभेत अर्थ विभागाने मांडले अंदाजपत्र
पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 2019-20 च्या 311 कोटी 50 लाख रूपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. त्यामध्ये 110 कोटी पुरवणी अंदाजपत्र तयार करून एकूण 421 कोटी 50 लाख रूपयांचे अंदाजपत्र अर्थ विभागाकडून सर्वसाधारण सभेपुढे मंगळवारी (दि. 28) मांडण्यात आले. दरम्यान, या अंदाजपत्रकामध्ये सर्वसाधारण सभेकडून सूचविण्यात येणारे बदल करण्यात येतील, असे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, सभापती प्रवीण माने, राणी शेळके, सुजाता पवार, सुरेखा चौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यंदाचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या सहीने मंजुर करण्यात आले. यावर्षी 311 कोटी 50 लाख रूपयांचे अंदाजपत्रक मंजुर केले असून त्यामध्ये 110 कोटी रूपयांचे पुरवणी वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेतील पंचायत, शिक्षण, इमारत व दळणवळण (दक्षिण) आणि इमारत व दळणवळण (उत्तर), कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण विभागासाठी भरीव निधीची तरतूद केली जाते. त्यानुसार यंदाच्या मुळ अंदाजपत्रकात पंचायत विभागासाठी 17 कोटी 16 लाख 92 हजार रूपयांची तरतूद केली असून, पुरवणी वाटपामध्ये 16 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क ग्रामपंचायतींना वाटप करण्यासाठी 120 कोटी रूपयांची तरतूद असून, पुरवणीमध्ये 29 कोटी 61 लाख रूपयांची वाढीव तरतूद केली आहे. कृषी विभागासाठी तरतूद केलेल्या 6 कोटी 50 लाख रूपयामध्ये 5 कोटींची पुरवणी निधीची अधिकची तरतूद केली आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी 10 कोटी 80 लाख रूपयांची पुरवणी निधीची तरतूद केली आहे.