पुणे – जात प्रमाणपत्र पडताळणी करुन वैध करण्यासाठी ३ लाख रूपये मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना जात पडताळणी समितीच्या उपायुक्तांना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे (वय ४०)यांना शनिवारी ( दि. १६) रात्री वानवडी येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ रंगेहाथ पकडले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नितीन ढगे उपायुक्त आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत. तक्रारदाराने पत्नीने जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज केला होता. ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने ८ लाख रुपयांची लाच मागितली. त्याबाबत दाखल झालेल्या तक्रारीची पडताळणी सुरु होती.
तडजोड करुन ३ लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ढगे यांनी शनिवारी रात्री तक्रारदार यांना घेउन वानवडीतील निवासस्थानाजवळ बोलाविले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा रचला. त्यानंतर तक्रारदाराकडून १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना रंगेहाथ पकडले. यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.