पुणे – सेवा निवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण संस्थेच्या महिला अध्यक्षासह लिपीक आणि खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाचे अध्यक्षा मंगल शिवाजीराव भुजबळ (६३), लिपीक संदीप रंगनाथ गायकवाड (४०), शिवाजीराव बाळासाहेब भुजबळ (६२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत २४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.
तक्रारदार यांचे वडील या शिक्षण संस्थेमध्ये शिपाई पदावर नोकरीस आहेत. त्यांची प्रकृती बरी नसल्याच्या कारणावरून त्यांना कामावरून कमी न करण्यासाठी तसेच भविष्यात सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडे साडेतीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती अडीच लाख स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.