पुणे – करोनाकाळात स्मशानभूमीत सुमारे 1 कोटी रुपयांचे काम केल्याचे दाखवून बनावट बिल सादर करणाऱ्या ठेकेदराविरोधात महापालिकेकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या संबंधित ठेकेदाराची महापालिकेच्या इतर सर्व विभागांतील कामांची तापसणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी या ठेकेदाराची सुरू असलेली कामे थांबवावीत तसेच त्यांचे कोणतेही बिल देऊ नये अशी विनंती विद्युत विभागाकडून सर्व विभाग प्रमुखांना करण्यात आली आहे.
मे. आशय इंजिनिअर्स अँड असोसिएट्स या ठेकेदाराकडून महापालिकेच्या वैकूंठ, बाणेर, हडपसर तसेच कोथरूड येथील स्मशानभूमीत कामे केल्याचे दाखवित महापालिकेस सुमारे 1 कोटी रुपयांचे बिल सादर केले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर महापालिकेकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिकेने प्रशासकीय समिती नेमली असून या समितीने चौकशी सुरू केली आहे. हा सर्व प्रकार विद्युत विभागाशी संबंधित असल्याने या बिलावर विद्युत विभागाच्या अभियंत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा दावा या अभियंत्यांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता विद्युत विभागाने हे प्रकरण लक्षात घेता. या ठेकेदारांची शहरात सुरू असलेली इतर कामे थांबविण्यासाठी विभाग प्रमुखांना विनंती केली आहे. त्यानुसार, सुरू असलेली सर्व कामे थांबवावित तसेच कोणतीही बिले देऊ नयेत अशी विनंती करण्यात आली आहे.
चौकशीसाठी फक्त तीनच कागद
या प्रकरणाची महापालिकेच्या दक्षता विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, या चौकशीसाठी केवळ तीनच कागद असल्याचे समोर आले आहे. त्यात, ठेकेदाराने सादर केलेले बिल तसेच त्यावर इतर विभागांनी दिलेला अभिप्राय याचा समावेश आहे. त्यामुळे ही चौकशी कशाच्या आधारावर करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, त्याचवेळी ही फाईल दाखल करून घेण्यासाठी घेण्यात आलेला आवक क्रमांक हा खरा असल्याने ही फाईल कोणी दाखल केली आणि त्याला आवक क्रमांक कोणी दिला यावरून चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी फाईलवर असलेला आवक क्रमांकही बनावट असल्याचे सांगण्यात येत होते.