पुणे – गुंड हसन शेख खूनप्रकरणी दोघे अटकेत

पुणे – धायरीतील गुंड हसन शेख याचा नारायणपूर येथे झालेल्या खून प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले गेले आहे. दोन मे रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली होती. शेख याची गाडी थांबवून दहा जणांनी त्याच्यावर गावठी कट्टयाने गोळ्या झाडून कोयत्याने वार करत हत्या केली होती.

अभिषेक उमेश ढुमणे (20), स्वप्नील संध्या काळे (20, दोघेही रा.बनकरवस्ती धायरी गाव), अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार मंगेश शिवाजी कदम (धायरी), एकनाथ शिंदे, संक्‍या माताळे, गोविंद राजेंद्र वाघ (नऱ्हे), सोन्या गायकवाड, दाद्या कडू, वैभव इटकर, सुमित रंजीत गायकवाड आणि इतर पाच ते सहा जणांविरुध्द गुन्हे दाखल आहेत.

मयत हसन शेख व मंगेश कदम यांचे धायरी येथील जमीन व्यवहार तसेच परिसरातील वर्चस्वावरून वाद होते. यापूर्वी देखील हसन शेख याच्यावर खुनी हल्ला झाला होता. घटनेच्या दिवसी हसन शेख याच्यावर 11 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तोंडावर आणि डोक्‍यावर कोयत्याने वार केले गेले होते. हसन शेख मित्रासह नारायणपूर येथून देवदर्शन घेऊन मित्रांसह धायरी येथे परतत होता. यावेळी नारायणपूरपासून दोन किलोमीटरवर असलेल्या कोडीत गावच्या हद्दीत त्याच्या ब्रिझा कारला बोलेरे गाडी आडवी घालून धडक देण्यात आली. यानंतर त्याच्यावर गावठी कट्याने गोळीबार करुन कोयत्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी 14 ते 15 जणांविरुध्द सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. बी. घोलप यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)