पुणे : लाडक्या बहिणींची रद्द झालेली नावे काढा, त्यांचे पत्ते शोधा, त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि तुम्हाला फसवले आहे, असे त्यांना सांगा. त्यांना आपल्या बाजूने करा, असा गुरूमंत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्ह्याचे प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी रविवारी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला. आता पक्षबांधणीला सुरुवात करा. सत्ताधारी पक्षात प्रत्येक जणच एकमेकांच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवून बसला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करा, आम्हाला बोलवा आम्ही येऊ, असे आश्वासनही शिंदे यांनी या वेळी दिले.
पुणे, पिंपरी- चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्य आढावा बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, आमदार बापू पठारे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, प्रवक्ते, नेते उपस्थित होते. विरोधी पक्ष म्हणून आपण काय करू शकतो, हे आता सत्ताधाऱ्यांना दाखवायला हवे. प्रत्येक नेता प्रत्येक मतदारसंघात काम करणार आहे, जे करणार नाहीत, त्यांना पक्षातून बाहेर काढून नव्यांना संधी देऊ, असा दम शिंदे यांनी दिला.
अर्थसंकल्पातील त्रुटी, फसवी लाडकी बहीण योजना, शिवथाळी भोजन, आनंदाचा शिधा योजना बंद असे अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत आंदोलन करून खरा विरोधी पक्ष दाखवून देऊ. प्रत्येक तालुक्यात १०० सक्रिय कार्यकर्त्यांची फौज उभी करू. हे करत असताना आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी त्याच्या मदतीला पदाधिकारी म्हणून धावून जा, असाही सल्ला शिंदे यांनी दिला.
येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यादिवशी आम्ही पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात २०० कार्यकर्ते उभे करू जे सक्रीयपणे काम करतील, असे आश्वासन खा. सुळे यांनी दिले. सातारा आणि पुण्यामध्ये तुम्ही याची स्पर्धा करा, असे सुळे म्हणाल्या.
विधानसभेचा निकाल असा कसा लागला, यावर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही. आपण पराभूत झालो आहोत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण आता तयारीला लागले पाहिजे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
पक्ष संघटना चांगली तयार करावी लागेल. जुन्या- नव्यांना संधी द्यावी लागेल. बऱ्याच ठिकाणी पदे रिक्त आहेत, ती भरावी लागणार आहेत. तरुणांना संधी आपल्याला मोठ्या प्रमाणात द्यावी लागेल. पक्षाने आपल्याला सत्ता, पदे, मानसन्मान दिला; परंतु आपण पक्षाला काय देणार, हा विचार करण्याची वेळ आहे. लोकांपर्यंत जाणे आवश्यक आहे, हे लक्षात आले आहे. त्यादृष्टीने नवनव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय पक्ष वाढणार नाही, असेही पाटील म्हणाले.