पुणे – बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रादेशिक सैन्य दलाच्या नावाखाली भरतीही बनावट केली. या माध्यमातून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचे रॅकेट लष्कर आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे उघडकीस आणले. यात पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण लष्कर भरती प्रशिक्षण केंद्र चालवत होता.
लष्कर पेपरफुटी प्रकारानंतर आता लष्करातील बनावट भरतीचा प्रकार उडकीस आला आहे. तरुणांना लष्कर आणि इतर शासकीय नोकरीचे अमिष दाखवत, त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत त्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती लष्कराच्या सदर्न कमांडच्या इंटेलिजेंस एजन्सींच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
याबाबत त्यांनी पुणे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “लष्कराच्या सदर्न कमांडच्या इंटेलिजेंस एजन्सींच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांना याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट-5 ची दोन पथके तयार केली. या कारवाईत भारत कृष्ण काटे (रा.मु.पो. राजूर, तालुका सांगोला,जि. सोलापूर) आणि पंडित पवार या दोघांना सोलापूर येथून अटक केली.
त्यापैकी काटे ही व्यक्ती सोलापूर येथे लष्कर भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था चालवत असून, तो प्रादेशिक सेनेची बनावट वेबसाइट चालवत असे. तरुणांना भरतीचे आमिष दाखवत सैन्य दल भरतीसाठी सहा लाख रु., रेल्वेत तिकीट चेकर या पदावर भरतीसाठी सात लाख रुपयांची मागणी करत असत. आरोपींनी आतापर्यंत याप्रकरणी 13 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
मेडिकल टेस्ट, वेबसाइट अन् सगळंच बोगस
हे दोन भामटे तरुणांना दिल्ली, झांसी, लखनौ, जबलपूर आदी ठिकाणी मेडिकल टेस्टसाठी पाठवत होते. विशेष म्हणजे ही चाचणीही बोगसच होती. तर, बनावट संकेस्थळावर या तरुणांचा बनावट निकाल जाहीर केला जात असे. तरुणांना खोटे नियुक्तीपत्र देण्यापर्यंत या भामट्यांची मजल गेली होती.