धनकवडी – पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्र. 39 मध्ये उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील मालमत्तेचे नुकसान करीत फलकावर असलेल्या नगरसेवकाच्या नावावर काळी शाई टाकून फलक विद्रूप करण्यात आल्याने नगरसेवक विशाल तांबे यांच्यासह नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे व अश्विनी भागवत यांनी अज्ञातांविरोधात धनकवडी-सहकारनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे.
पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याच्या चर्चेतून धनकवडी-आंबेगाव पठार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धनकवडी-आंबेगाव पठार परिसरातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांच्या फलकांवरील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या नावाला “टार्गेट’ करत रविवारी (दि.24) काळी शाई फेकण्यात आली आहे. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर नगरसेवक विशाल तांबे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी पोलिसांत तक्रार दिली असून याबाबत पुणे शहर पोलीस आयुक्त, पुणे सहायक आयुक्त यांच्याकडेही तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
चार विरंगुळा केंद्रांच्या फलकांचे विद्रूपीकरण…
लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनाबाहेरील विरंगुळा केंद्र, मुंगळे अण्णानगर येथील शिवाई देवी विरंगुळा केंद्र, सर्व्हे नंबर 29 येथील माय स्कूलजवळील स्व. मोहनराव भिंताडे विरंगुळा केंद्र व सर्व्हे नंबर 28 चैतन्यनगरमधील विरंगुळा केंद्र अशा चार ठिकाणच्या फलकांवर एकाच वेळी काही समाजकंटकांनी नगरसेवकांच्या नावांवर काळी शाई टाकून नावे मिटवण्याचा प्रयत्न केला.
धनकवडी येथील विरंगुळा केंद्रावरील महानगरपालिकेच्या विरंगुळा केंद्राच्या फलकांवर काळी शाई फेकत विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये मिळाले आहेत. त्यानुसार तपास सुरू करण्यात आला असून, लवकरात लवकर या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात येईल.
– स्वाती देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
धनकवडी सहकारनगर पोलीस स्टेशन