पुणे – प्रभाग समित्यांवर भाजपचाच झेंडा

12 अध्यक्षपद भाजपकडे, तर तीन राष्ट्रवादीकडे

पुणे – महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला 12 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 3 अध्यक्षपद मिळाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि कॉंग्रेसला एकही अध्यक्षपद मिळाले नाही. दरम्यान, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समितीसाठी काढण्यात आलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपच्या मंगला मंत्री यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली.

महापालिकेच्या 15 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी सोमवारी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून “पीएमपी’च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी काम पाहिले.

या निवडणुकीसाठी 2 मे रोजी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पंधरा पैकी नऊ प्रभागांमध्ये अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्याचे चित्र “क्‍लिअर’ झाले होते. यात भाजपला 8 आणि राष्ट्रवादीला 1 अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे सोमवारी सहा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.

…तरीही शिवसेनेने पाळला युतीधर्म
ही निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने आघाडीने एकत्रित येऊन लढविली. मात्र भाजपने शिवसेनेला एकही प्रभाग समिती अध्यक्षपद दिले नाही. सर्वच जागांवर भाजपने स्वत:चे उमेदवार उभे केले. त्यामुळे उरलेल्या सहा जागांवर सेनेचे नगरसेवर भाजपला मतदान करणार की तठस्थ राहणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, शिवसेनेने मोठेपणा दाखवत भाजपच्या उमेदवारांना मत देऊन युतीधर्म पाळला.

चिठ्ठीतून मंगला मंत्री यांना “लॉटरी’
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समितीमध्ये एकूण आठ नगरसेवक आहेत. त्यात भाजपचे चार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांची संख्या समसमान आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड चिठ्ठी टाकून करण्यात आली. चिठ्ठीत भाजपच्या मंगला मंत्री यांचे नाव निघाल्याने त्यांना अध्यक्षपदाची “लॉटरी’ लागली.

बिनविरोध निवडून आलेले प्रभाग समितीचे अध्यक्ष : 
– औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय – ज्योती कळमकर (भाजप),
– शिवाजीनगर घोले रोड – आदित्य माळवे (भाजप),
– सिंहगड रोड – नीता दांगट (भाजप),
– कोंढवा येवलेवाडी – मनिषा कदम (भाजप),
– कसबा विश्रामबागवाडा – स्मिता वस्ते (भाजप),
– बिबवेवाडी – प्रवीण चोरबेले (भाजप),
– येरवडा कळस धानोरी – मारुती सांगळे (भाजप),
– कोथरूड – छाया मारणे (भाजप),
– वानवडी – रामटेकडी- रत्नप्रभा जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

निवडून आलेली सहा प्रभाग समिती अध्यक्ष
– नगररस्ता-वडगावशेरी – मुक्ता जगताप (भाजप)
– धनकवडी-सहकारनगर – युवराज बेलदरे (राष्ट्रवादी)
– वारजे-कर्वेनगर – जयंत भावे (भाजप)
– हडपसर-मुंढवा – पूजा कोद्रे (राष्ट्रवादी)
– भवानीपेठ – सुलोचना कोंढरे(भाजप)
ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय – चिठ्ठी टाकून निवडून आलेल्या – मंगला मंत्री

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.