खासगी हॉस्पिटलच्या गैरप्रकारला आळा बसण्यासाठी पथके
पुणे – करोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्याच्या गैरप्रकारला आळा बसण्यासाठी आता खासगी हॉस्पिटलनी दिलेल्या दीड लाख रुपयांवरील रकमेच्या बिलांचे पूर्व तपासणी करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. यासाठी शहरातील 30 हॉस्पिटलसाठी बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहे. दीड लाखांपेक्षा अधिकचे बिल हे हॉस्पिटलकडून लेखापरीक्षण पथकाला दिले जाणार आहे. या बिलांची तपासणी केल्यानंतर जादा दर आकारण्यात आले असेल तर त्याबाबतचे म्हणणे रुग्णालयांकडून मागविले जाणार आहे. आकारलेले बिल योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ते बिल रुग्णांना अथवा नातेवाईकांना दिले जाणार आहे.
करोना परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. खासगी हॉस्पिटलकडून करोनाच्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन रुग्णांना बिल देण्यापूर्वीच दीड लाखांपेक्षा अधिकची बिले तपासणी करण्यात येण्याचा निर्णय राव यांनी घेतला आहे.
याविषयी माहिती देताना राव यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांतील बिलांची तपासणी करण्यासाठी 28 लेखापरिक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच 8 उपजिल्हाधिकारी यांचीसुद्धा नियुक्ती केली आहे. या सर्वांना जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. हे पथक शहरातील 30 खासगी हॉस्पिटलमधील बिलांची तपासणी करणार आहे. हॉस्पिटलमधील बिलांमध्ये अनेक तांत्रिक बाबी असतात त्यामुळे बिलांची तपासणी करण्यासाठी चार डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचाराची मर्यादा 1 लाख 50 हजार रुपये असल्याने या मर्यादेतच बिलांची तपासणी केली जाणार आहे. बिलांची पूर्व तपासणी करण्यासाठी जादा वेळ लागला तर रुग्णांना सोडण्यास उशीर होईल अशी शंका हॉस्पिटलकडून उपस्थित करण्यात आली, यावर राव यांनी सांगितले की, खासगी हॉस्पिटलकडून बिल आल्यानंतर एक तासाच्या आत बिलांची तपासणी करून त्याबाबतचा निर्णय कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ते रुग्णांना दिले जाणार आहे. जम्बो हॉस्पिटल उभे राहण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत खासगी हॉस्पिटलवर अवलंबून रहावे लागत आहे.
83 तक्रारी प्राप्त…
खासगी हॉस्पिटलकडून जादा बिले आकारल्याप्रकरणी 83 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार संबधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आली आहे. यातील 11 प्रकरणांमध्ये हॉस्पिटलकडून उत्तर देण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राव यांनी दिली.