पुणे : घन कचरा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित बनावट कंपनी स्थापन करुन तब्बल ११० जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीत भाडेतत्त्वावर वाहने लागणार असल्याची बतावणी करुन आरोपींनी गुंतवणूकदारांना मोटार, दुचाकी, जेसीबी यंत्र अशी वाहने खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी या वाहनांची परस्पर विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले. प्राथमिक तपासात आरोपींनी ११० जणांची फसवणूक केली असून, फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी संकेत सुधीर थोरात (३०, रा. हांडेवाडी), सोनूू नवनाथ हिंगे (२९), रिजवान फारुख मेमन (४४, रा. गणेश पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. प्रणय उदय खरे (३२), वृषाली संतोष रायसोनी (२४, रा. बिबवेवाडी), विजय चंद्रकांत आशर (६५, रा. ईस्कॉन मंदिराजवळ, टिळेकरनगर, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश खंडु शिंदे ( २४, रा. अवसरी बुद्रुक, ता.आंबेगाव, जि. पुणे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे आणि आरोपी सोनू हिंगे मूळचे आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक गावचे रहिवासी आहेत. आरोपींनी वानवडीतील जगताप चौक परिसरात असलेल्या एका इमारतीत कार्यालय सुरु केले होते. बाया फिक्स प्रो कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी हिंगे याने तक्रारदार शिंदे यांच्याकडे केली होती. ही कंपनी घन कचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करत आहे. कंपनीला जेसीबी यंत्रांची आवश्यकता आहे. भाडेतत्त्वावर जेसीबी यंत्र वापरासाठी घेण्यात येणार आहे, असे त्याने शिंदे यांना सांगितले होते. जेसीबी यंत्र वापरास दिल्यानंतर दरमहा एक लाख ३० हजार रुपये भाडे कंपनी देणार आहे. सात वर्ष जेसीबी यंत्र वापरण्यात येणार असून, वस्तू आणि सेवा कर कंपनीकडून भरण्यात येणार असल्याची बतावणी आरोपी हिंगेने शिंदे यांच्याकडे केली होती.
शिंदे यांनी हिंगेच्या म्हणण्याला भुलून १४ डिसेंबर २०२४ रोजी ३९ लाख रुपयांचे जेसीबी यंत्र खरेदी केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी बायोफिक्स प्रो कंपनीस जेसीबी यंत्र वापरास दिले. जानेवारी महिन्यात त्यांना जेसीबी यंत्राच्या भाड्यापोटी ६० हजार रुपये देण्यात आले. उर्वरित रक्कम त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे शिंदे यांनी जेसीबी यंत्र कुठे ठेवले आहे? अशी विचारणा केली. त्या वेळी हिंगेने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत जेसीबी यंत्र कात्रज-कोंढवा रस्त्यावर असलेल्या उंड्रीतील गोदामात लावल्याचे आढळून आले. याबाबत रिजवान मेमन याच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा दर्पण ठक्कर याच्या मध्यस्थीने जेसीबी, पोकलँड यंत्र खरेदी केल्याचे मेमन याने सांगितले. चौकशीत आराेपींनी बायोफिक्स प्रा. लि. कंपनी, म्युफ्याको कंपनी, भारत इंडस्ट्रीज अशा कंपनीत वाहने भाडेतत्त्वावर लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. जवळपास ११० गुंतवणुकदारांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करत आहेत.