पुणे – बसथांब्यांसाठी सायकलट्रॅकवर ‘हातोडा’

महापालिकेकडून नव्याने प्रयोग : सातारा रस्ता म्हणजे “गिनीपीग’

पुणे – स्वारगेट ते कात्रज दरम्यान असलेला सातारा रस्ता हा शहरातील “गिनी पीग’ रस्ता म्हणून काही दिवसांनी नावारुपास आल्यास कोणाला आश्‍चर्य वाटू नये. कारण, आजपर्यंत या रस्त्यावर एवढे प्रयोग केले गेले आहेत आणि एवढा पैसा खर्च केला गेला आहे, की तो आता सर्वात श्रीमंत रस्ताही झाला आहे. एवढे प्रयोग झाल्यानंतर आता तेथे सायकल ट्रॅक तोडून बसथांबे करण्याचा नवा प्रयोग महापालिकेने आरंभला आहे.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नव्यानेच तयार करण्यात आलेला सायकल ट्रॅक तोडून बसथांबे उभारायचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत या रस्त्यावर सव्वाशे कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. तरीही या रस्त्यावरून अद्याप बीआरटी बस धावून शकलेली नाही. बीआरटी मार्गाच्या विकसनाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी सुरूच असून, हा रस्ता महापालिकेसाठी अक्षरश: “कुरण’ झाला आहे.

या रस्त्यावर बीआरटी पुनर्विकास आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली आतापर्यंत सव्वाशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यावर प्रतिकिलोमीटर तब्बल 18 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, समस्या मात्र जैसे थेच आहेत.

शहरातील पहिला बीआरटी मार्ग याच रस्त्यावर तयार केला होता. त्यानंतर बीआरटीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले. तसेच, संपूर्ण सहा किमीचा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यात आला. अद्ययावत सायकल ट्रॅकसोबतच सुशोभिकरणाचा दावा प्रशासनाने केला होता. यासोबतच पदपथांचे रुंदीकरणही करण्यात आले. त्याच्यावरही भरमसाठ खर्च करण्यात आला. मात्र, वाहतूक कोंडी अद्यापही सुटलेली नाही. तसेच, वेळोवेळी वेगवेगळे प्रयोग राबवूनही बीआरटी मार्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे या रस्त्यावर खर्च केलेला पैसा नेमला कुठे गेला हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. बीआरटी पुनर्रचनेसोबतच अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्सप्रमाणे रस्त्याचा पुनर्विकास हाती घेण्यात आला होता.

पाच बसथांबे उभारले जाणार
दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही रस्त्याची कामे शिल्लक आहेत. आवश्‍यकता नसतानाही उत्तम स्थितीतील रस्त्यावर विविध प्रयोग राबवत प्रशासन नागरिकांच्या डोक्‍याचा ताप वाढवला जात आहे. सव्वाशे कोटींच्या कामापैकी 80 लाखांचा बसथांबा बांधून तयार असताना कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या सायकल ट्रॅकवर बस थांब्याचे शेड बांधण्याचे काम वाळवेकर नगर येथे सुरू करण्यात आले आहे. अशा प्रकारचे पाच बसथांबे सातारा रस्त्यावर उभारले जाणार आहेत.

सायकल योजनेलाच हरताळ
एकीकडे शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली सायकल ट्रॅक उभारुन सायकल योजना आणण्यात आलेली असतानाच दुसरीकडे मात्र सायकल ट्रॅकवरच हातोडा चालवून तेथे बसथांबे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सायकल योजनेच्या कन्सेप्टलाच हरताळ फासला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय असून प्रशासनाला याबाबत जाब विचारण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.