पुणे- महापालिका प्रशासनात ई-वाहनांचा समावेश झाला, मात्र ही वाहने चार्जिंग करण्यासाठी पालिकेच्या आवारात चार्जिंग स्टेशनच नाहीत. त्यामुळे भोसरी येथील चार्जिंग स्टेशनला वाहने घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत चार्जिंग स्टेशन कधी होणार, अजून किती दिवस ही वाहने चार्जिंगसाठी भोसरी घेऊन जायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे महानगरपालिकेने मार्चच्या सुरुवातीला दहा ई-वाहने घेतली. सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी या वाहनांचा वापर करीत आहेत. मात्र, ही ई-वाहने खरेदी केल्यानंतर त्यासाठी चार्जिंग स्टेशनच नसल्याने चार्जिंगसाठी भोसरीला पाठवावी लागत आहेत. त्यामुळे केवळ चार्जिंगसाठी ही वाहने तब्बल 35 किलोमीटर लांब पाठवावी लागत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, महापालिका आवारातच चार्जिंग स्टेशनसाठी जागा देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र, अद्याप हे चार्जिंग स्टेशन उभे राहिलेले नाहीत. महापालिकेत चार्जिंग स्टेशनसाठी ठरलेल्या जागेबाबत काही अडचणी आहेत. जागा निश्चित झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांत चार्जिंग स्टेशन उभारले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी महापालिकेच्या आवारातील पार्किंगमधील जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अद्याप चार्जिंग स्टेशन उभी राहिलेली नाहीत. याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येईल.
– डॉ. कुणाल खेमनार, अितिरिक्त आयुक्त
ई-व्हेइकल्सच्या फास्ट चार्जिंग स्टेशनसाठी ठेकेदारानेच निवडलेल्या दोन जागांवर फास्ट चार्जिंग स्टेशनसाठी आयुक्तांनी जागा निश्चित केली. जागेचे भाडे आणि चार्जिंगसाठीचा वीजेचा खर्च ठेकेदाराच देणार आहे. मान्यतेनंतर तीन आठवडे होऊनही चार्जिंग स्टेशन उभे राहिलेले नाही. त्याबाबत संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली जाईल.
– श्रीनिवास कंदुल, विद्युत विभागप्रमुख, पुणे महापालिका