पुणे – गेल्या महिनाभरापासून पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलेले भामा-आसखेड योजनेचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. हे काम आता तीन शिफ्टमध्ये करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी रात्रीच्या वेळीही पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे. सध्या सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत दोन शिफ्टमध्ये हे काम सुरू आहे.
शहराच्या पूर्व भागाला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून ही योजना प्रस्तावित करण्यात आली असून तिचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून न्याय पुनर्वसनाच्या मागणीसाठी तीन ते साडेतीन वर्षे वेळोवेळी हे काम बंद पाडण्यात आले आहे. त्यामुळे ते रखडले असून महापालिकेस आर्थिक फटका बसत आहे.
महापालिकेकडून ही योजना ऑक्टोबर 2019 मध्ये कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, 7 मार्चपासून पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी ऐन लोकसभा निवडणुकीत हे काम बंद पाडल्याने प्रशासनाची अडचण झाली होती. अखेर मेमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त मिळवित हे काम पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी जॅकवेलचे महत्वाचे काम पूर्ण करायचे असल्याने प्रशासनाला दोन महिन्यांचा वाया गेलेला कालावधी तीन शिफ्टमध्ये काम करून भरून काढायचा आहे. सध्या पोलीस बंदोबस्त कामाच्या वेळेतच मिळत आहे. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये काम करायचे झाल्यास रात्रीही बंदोबस्ताची गरज असणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून लवकरच त्यासाठी बंदोबस्त मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तीन शिफ्टमध्ये काम करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.