पुणे (मिलन म्हेत्रे / रामकुमार आगरवाल) श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा भूमिपूजन श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्म चतु:शताब्दी सोहळा वर्षांमध्ये तात्कलीन पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते 11
ऑक्टोबर 2008 ला झाले होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा 14 जूनला होत असल्याने वारकरी संप्रदाय, तसेच देहूकरांसाठी अविस्मरणीय क्षण आहे.
तीर्थक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले असून 14 जूनला पंतप्रधान मोदींचे तीर्थक्षेत्र देहूत प्रथमच आगमन होत आहे.
ज्ञानदेवें रचिला पाया … तुका झालासे कळस । भजन करा सावकाश । जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या संत हिणाबाई यांनी संतांचे केलेले वर्णन आजही यथोचित ठरते आहे. जगद्गरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुमारे 14 वर्षे सुरू झाले होते. भूमिपूजन तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते झाले होते आणि यावेळी तत्कालीन राज्यपाल एस. सी. जमीर, मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री अजित पवार, पणन मंत्री हर्षवर्धन पाटील, ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार बाळासाहेब विखे पाटील, आमदार विलास लांडे उपस्थित होते.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथा पवित्र इंद्रायणी नदीत बुडविल्यानंतर या गाथा तेरा दिवसांनी तरल्या गेल्या, या कालावधीत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न, पाणी सोडले आणि ते अनुष्ठानस बसले.
श्री विठ्ठलाच्या कृपेने गाथा दगडांसह वर आल्या आणि तुकोबांनी त्यांचे अनुष्ठान सोडले. ज्या शिळेवर तुकोबा बसले होते, ती शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तुकोबांचे चिरंजीव पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांनी देहूच्या मंदिरात आणून ठेवली होती. भाविक, वारकरी या शिळेचे दर्शन घेत होते. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा मानस होता. त्यानुसार श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या सहकार्याने हे मंदिर साकारले गेले.
इंद्रायणी नदीला गंगा नदीचे महत्त्व
दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी आणि नदीच्या काठावर तीर्थक्षेत्र असणाऱ्या हरिद्वारानंतर (काशी) देशातील देहू तीर्थक्षेत्र हे दुसरे तीर्थक्षेत्र आहे.
मंदिराचे वैशिष्ट्य
या शिळा मंदिराचे बांधकाम काळा पाषाणामध्ये केले आहे. मंदिरावर नक्षीकाम करण्यात आले असून मोर, हत्ती यांचे कोरीव नक्षीकाम करण्यात आलं आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी असून मूळ गर्भगृह 14 बाय 14, अंतर गर्भगृह 9 बाय 9, उंची 17 बाय 12, तर मंदिराची उंची 42 फूट आहे. या शिळा मंदिरावर 36 कळस असून, दोन सुवर्ण कळस 42 इंचांचे आहेत, तर 34 कळस 14 इंचाचे आहेत.
तुकोबांची रेखीव मूर्ती
मंदिरातील तुकोबांची 42 इंच उंचीची मूर्ती राजस्थान येथील एका खाणीतील दगडापासून घडवण्यात आली आहे. संत तुकारामांची मूर्ती 42 दिवसांत साकारण्यात आली आहे. तुकोबांचं वय 42 सांगण्यात आलं होतं. त्यामुळं त्याच वयातील तुकोबा साकारण्याचं मोठं आव्हान स्वीकारण्यात आलं होतं. मूर्तीमध्ये वीणा, चिपळे, पगडी अशा त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी साकारण्यात आल्या आहेत.