पुणे – डिबीटीअंतर्गत विविध वस्तूंचा लाभ

पुणे – जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून यावर्षी डिबीटी योजनेअंतर्गत गाय-म्हैस आणि विविध वस्तूंचा लाभ देणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी केवळ “मिल्किंग मशीन’ हा एकच पर्याय न देता, शेतकऱ्यांसाठी पाच वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका वस्तूसाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळेल, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील पशुपालकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून डिबीटी योजना राबविली जाते. त्यामध्ये मैत्रीण योजनेअंतर्गत तीन शेळ्यांसाठी अनुदान दिले जात होते. परंतु, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडूनही शेळी आणि मेंढी दिली जाते. त्यामुळे यावर्षी पशुसंवर्धन विभागाकडून शेळ्यांएवजी गाई किंवा म्हशीसाठी 20 हजार रुपये अनुदान लाभार्थ्याला देणार आहे. तसेच, त्या पशुचा एक वर्षांचा विमाही काढण्यात येणार आहे. तसेच, गतवर्षी मिल्किंग मशीनसाठी 75 टक्‍के अनुदान देण्यात आले होते. यावर्षी लाभार्थ्यांना मिल्किंग मशीनसह मुक्‍त संचार गोठा अंतर्गत जाळी पुरवठा, मुरघास युनिट तयार करणे, सिंगल फेज विद्युत चलित कडबाकुट्टी मशीन या पाच वस्तूंचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यापैकी लाभार्थ्याला एका वस्तूसाठी 15 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तर सुधारित 100 तलंग कुक्कुट पक्ष्यांसाठी 50 टक्‍के अनुदान देण्यात येणार आहे.

“त्या’ कुटुंबाला मैत्रीण योजनेचा मिळणार लाभ
ज्या घरात 0 ते 3 वर्षे वयोगटातील मुलगी आहे. त्या कुटुंबालाच मैत्रीण योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.