दि. 9 फेब्रुवारीपासून दररोज सकाळी 6 वाजता सुटणार
पुणे – मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पुणे-बेळगाव-पुणे एक्स्प्रेसचे वेळापत्रक सोमवारी जाहीर झाले. ही गाडी दि. 9 फेब्रुवारीपासून पुण्यातून धावणार आहे.
या मार्गावर थेट गाडी नसल्याने पुणे-बेळगाव-पुणे जनशताब्दी एक्स्प्रेसची मागणी अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून करण्यात येत होती. या गाडीमुळे कमी वेळामध्ये बेळगावला सुमारे सात तासांमध्ये पोहोचणार आहे. येत्या काळात पुणे-सांगली-मिरजमार्गे बेळगावला जलद रेल्वे धावण्याची शक्यता असून, पर्यटन आणि उद्योगासाठी ही गाडी वरदान ठरणार आहे. याबाबतचे वृत्त दै. “प्रभात’मध्ये दि. 6 नोव्हेंबर रोजी “पुणे-बेळगाव जनशताब्दी इज अरायव्हिंग शॉर्टली’ या मथळ्याखाली प्रकाशित केले होते.
पुण्यातून सकाळी 6 वाजता ही गाडी सुटणार असून बेळगाव येथे दुपारी 1 वाजता ती पोहोचणार आहे. पुणे-बेळगाव अंतर 417 किलोमीटरचे आहे.
पुणे-हुबळी इंटरसिटीची मागणी अनेक वर्षांपासून होत असल्याने जनशताब्दी एक्स्प्रेसचा हुबळीपर्यंत विस्तार होण्याची गरज आहे, असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.
या मार्गांवर मिळणार थांबे
जनशताब्दीचा तिकीट दर एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणेच असणार असून या मार्गावर एकूण 9 स्थानकांवर प्रत्येकी दोन मिनिटांचा थांबा देण्यात येणार आहे. पुण्यातून ही गाडी सहा वाजता सुटून शिंदवणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, चिकोडी रोड आणि गोकाक रोड या स्थानकांवर थांबणार आहे.