पुणे – मतदानाआधी मतदान केंद्रांवर होणार “मॉक पोल’

ईव्हीएमविषयीच्या शंकांचे निरसन होण्यास मदत

पुणे – ईव्हीएमबद्दलचे गैरसमज तसेच वाद दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी सकाळी एक तास आधी मतदान केंद्रांवर मॉक पोल (मतदान चाचणी) घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत हे “मॉक पोल’ होणार असून यावेळी कमीत कमी 50 मते टाकून पाहिली जाणार आहे. यामुळे ईव्हीएमविषयीच्या शंकांचे निरसन होण्यास मदत होणार आहे.

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दि.23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर हे “मॉक पोल’ होणार आहे. यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमसोबत “व्हीव्हीपॅट’ हे मशीन जोडले जाणार आहे. त्यामुळे मतदाराला आपण दिलेले मत “व्हीव्हीपॅट मशीन’मध्ये प्रिंट स्वरुपात सात सेंकद दिसणार आहे.

दरम्यान “मॉक पोल’साठीचे प्रशिक्षण मतदान केंद्राध्यक्ष यांना देण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी एक तास आधी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रावर बोलविण्यात येणार आहे. त्यांच्यासमोर ईव्हीएममध्ये मते टाकून मॉक पोल घेतला जाणार आहे. सर्व उमेदवारांच्या चिन्हाबरोबरच नोटा समोरील बटन दाबून मत नोंदविले जाणार आहे. यामध्ये एकूण 50 मते टाकली जाणार जाणार आहे. हे मतदान झाल्यानंतर त्यानुसार “व्हीव्हीपॅट मशीन’मध्ये चिठ्ठ्या आहेत का, याचीही तपासणी केली जाणार आहे. हे सर्व बरोबर असेल तर या चिठ्ठ्या “व्हीव्हीपॅट मशीन’मध्ये काढून एका लिफाफ्यात सीलबंद केल्या जाणार आहेत. यावर सर्व प्रतिनिधींच्या स्वाक्षरी घेतली जाणार आहे. ही मते मोजली जाणार नाहीत. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर “व्हीव्हीपॅट’ व ईव्हीएम सिलबंद केली जाणार आहेत.

यामुळे ईव्हीएम नीट चालते का नाही, मतदान केल्यावर “बीप’ वाजते का नाही, व्हीव्हीपॅट मध्ये चिठ्ठ्या पडतात की नाही, मशीन अचूकपणे काम करत आहे का, याची माहिती मिळणार आहे. जर मशीनमध्ये काही दोष असेल, तर तत्काळ मशीन बदलल्या जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.