- दहशत, स्वसंरक्षण आणि हौसेसाठी पिस्तूलाची मागणी
- बिहार आणि उत्तर प्रदेशातील मोठे रॅकेट कार्यरत
संजय कडू
पुणे – उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बनणाऱ्या गावठी कट्ट्यांसाठी पुणे ही सुरक्षित बाजारपेठ बनल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. अवघ्या काही हजार रुपयांत मिळणाऱ्या या अग्निशस्त्रांमुळे मुंबईप्रमाणेच पुणेही गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनण्याची भीती आहे. गेल्या नऊ महिन्यांत पोलिसांनी तब्बल 59 पिस्तूल विकली आहेत. शहरासोबत पिस्तूल विकत घेण्याचे खूळ आता सभोवतालच्या ग्रामीण भागातही पसरल्याचे चित्र आहे.
शस्त्र बाळगण्याची हौस, प्रतिस्पर्धी टोळीपासून संरक्षण त्याचबरोबर गुन्हेगारी कारवायांसाठी पिस्तूलांची मागणी वाढली आहे. ती पुरवण्यासाठी अन्य राज्यांतून पिस्तूल आणि काडतुसांची तस्करी होत आहे. मागील 9 महिन्यांत शहरात 59 गावठी कट्ट्यांसह 109 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या व्यतिरिक्त कारवाईच्या कचाट्यात न सापडलेल्या शेकडो पिस्तूल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडे असण्याची भीत व्यिक्त होत आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशमधून गावठी पिस्तूल शहरात आणण्याचा मोठी साखळी प्रस्थापित झाली आहे. तेथे अवघ्या तीन ते पाच हजारांत मिळणारे पुण्यात 25 ते 50 हजार रुपयांपर्यंत विकतात. पिस्तूलची प्रकार आणि ठेवणीवर हा दर ठरतो.
दोन गावठी पिस्तूल, कट्टा आणि काडतुसे जप्त
चंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत काही आरोपी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री आणणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघा इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंग झडतीत दोन गावठी पिस्तूल, गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. समाधान विभुते (28) आणि गोपाल मुजमुले (21) अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
52 आरोपी गजाआड
अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या 9 जणांना मागील महिनाभरात पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर, अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी यावर्षी आतापर्यंत 41 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 52 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अजूनही सापडतील गुन्हेगार
शिक्षणाचे माहेरघर पुणे शहरातील गुन्हेगारीत कोयत्याचा सर्रास वापर होत आहे. मात्र दहशत, स्वसरंक्षण आणि हौस म्हणून पिस्तूल बाळगणाऱ्यांचे प्रमाणही हल्ली वाढले आहे. पिस्तूलाचा प्रत्यक्षात वापर करुन गुन्हे केलेल्याची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. मात्र, ते बाळगणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहेत.
तस्करीसाठी खासगी बसेस
शस्त्र तस्कर येताना एका वेळी तीन-चार पिस्तूल आणतो. प्रवासासाठी ट्रॅव्हल्स बसचा वापर करतात. रेल्वेतून पिस्तूल आणल्यास स्थानकावरील रेल्वे पोलीस तसेच तेथील मेटल डिटेक्टरमध्ये सापडण्याची शक्यता असते. यामुळे ट्रॅव्हल्सचा पर्याय सर्रास वापरला जातो. खासगी ट्रॅव्हल्स रात्रीचा प्रवास करुन भल्या पहाटे शहरात येतात. यामुळे बसमधून उतरल्यावर सहजपणे इच्छित स्थळी जाता येते.