झांबियातील भारतीयांकडून पुण्यातील व्यवसायिकाची पावणेदोन कोटीची फसवणूक

पुणे – झांबियात व्यवसाय असलेल्या दोघा भारतीयांकडून पुणे शहरातील व्यवसायीकाची पावणेदोन कोटीची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालेय वह्या, पीव्हीसी पाईप, सॅनिटायझर, इलेक्‍ट्रीकल वस्तू आदींची मागणी करुन त्याचे पैसे अदा करण्यात आले नाहीत.

एजाज रियाज शेरकर(49,रा.भंडारी लॅण्डमार्क, कोंढवा), प्रविण वसंत माटे(शोभा पार्क, कवेनगर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास मनोहर सावंत(59,रा. मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा इंडवे इंटरनॅशनल नावाचा आयात-निर्यात व्यवसाय आहे.ते पत्नीसह भागीदारीमध्ये घरातूनच हा व्यवसाय करतात. त्यांची आरोपी एजाज शेरकर बरोबर 2016 मध्ये ओळख झाली होती. शेरकर याने झांबिया येथे रहाण्यास असून भारतातून वेगवेगळ्या मालाची आयात करुन विक्री करत असल्याचे सांगितले होते. त्यांनी फिर्यादीकडे भारतातून माल निर्यात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. शेरकर याने वारंवार फिर्यादीशी संपर्क ठेवत त्यांना निर्यातीचा व्यवसाय करण्यास भाग पाडले. शेरकर याच्या मागणीनूसार फिर्यादीने प्रथम सांगली येथील एका कारखानदाराकडून शालेय वह्यांची निर्यात केली त्यानूसार त्यांनी झांबिया येथील समृध्दी इनव्हेसमेंट लि या कंपनीला माल पाठवला.

प्रथम एक कंटेनर पाठवल्यानंतर त्यांना खरेदी ऑर्डरवर प्रविण माटे यांची स्वाक्षरी आढळली. याची विचारणा करता शेरकर यांनी ते कंपनीचे मालक असल्याचे सांगितले. यानंतर शेरकर व माटे यांनी फिर्यादीला इलेक्‍ट्रीकल वस्तूंची झांबियात चांगली मागणी असल्याचे सांगत त्या पाठवण्यास प्रवृत्त केले. तसेच पीव्हीसी पाईप आणि फिटींगचीही ऑर्डर दिली. फिर्यादी यांनी जवळपास सात वेगवेगळे मालाचे कंटेनर आरोपींना पाठवून दिले आहेत. यातील काही मालाची रक्कम दिल्यानंतर उर्वरीत 1,63,49,130 रुपये अद्यापर्यंत दिले नाहीत. फिर्यादी यांनी वारंवार सपर्क केल्यावर हे दोघे त्यांना पुण्यात भेटले होते. तेथे त्यांनी पैसे परत देण्याचे आश्‍वासन दिले. यातील शेरकरने प्रथम वाई येथील जमीन नावावर करुन देण्याचे आणि नंतर कर्ज काढून रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र अद्याप पर्यंत फिर्यादीला रक्कम न मिळाल्याने त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. याप्रकारे आरोपींनी फिर्यादीबरोबर इतर आठ जणांचीही फसवणूक केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.