पुणे – शहर परिसरात घरफोडी तसेच वाहनचोरी करणारी आणि बारक्या टोळी म्हणून ओळख असलेल्या तिघांना गुन्हे शाखा यूनिट सहाच्या पथकाने अटक केली. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून १० लाख ३१ हजारांचे सुमारे १२९ ग्रॅम दागिने, चार वाहने जप्त केली आहेत.
पृथ्वीराज उर्फ साहील संतोष आव्हाड (१९, रा. हडपसर), आनंद उत्तरेश्वर लोंढे (३४, रा. हडपसर गाडीतळ), आर्यन आगलावे (१८, रा. कात्रज कोंढवा रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, एक अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरात वाहनचोरी, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, समीर पिलाने यांंना मिळालेल्या माहितीनूसार तिघांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून १० लाख ३१ हजारांचे १२९ ग्रॅम सोन्याचे दागिने, २ लाख ४० हजारांच्या ४ दुचाकी असा सुमारे साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून अंलकार, चतुःश्रूंगी, हडपसर, लोणीकंद या पोलीस ठाण्यातील वेगवेगळे ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, सचिन पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.