पुणे, बारामती लोकसभा : उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

पुण्यातून 48, तर बारामतीमधून 38 जणांनी अर्ज नेले


अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 4 एप्रिल

पुणे – पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी कोणत्याही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 30 जणांनी 48 अर्ज नेले आहेत. तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 19 जणांनी 38 अर्ज नेले आहेत. दरम्यान, पुढील एक-दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 4 एप्रिलपर्यंत आहे.

पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर मावळ आणि शिरूरसाठी दि. 9 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर, बारामती मतदारसंघासाठी अतिरिक्त विभागीय आयुक्‍त सुभाष डुंबरे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून 30 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर बारामती मतदारसंघासाठी विधानभवन येथील कार्यालयातून 19 जणांनी अर्ज नेले आहेत.

निवडणूक खर्चावर देखरेखसाठी निरिक्षकांची नियुक्ती
पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक निरिक्षक निवडणूक आयोगाने नियुक्त केले आहेत. पुणे लोकसभा मतदार संघासाठी सौरभ के. तिवारी; तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी रोहित राज गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली असून हे दोन्ही निरिक्षक पुण्यात दाखल झाले आहेत. हे दोन्ही निरिक्षक हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. त्यांना शनिवार व रविवार या दिवशी सकाळी 11 ते 12 या वेळेत भेटता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.