विश्रांतवाडी – वडगावशेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काॅंग्रेस- महविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी परिवर्तन महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अहिल्यादेवीनगर मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करुन पठारे यांच्या विजयाचे आवाहन केले. पठारे हे ५० हजारांच्या फरकाने निवडून येतील, हे लंके यांनी विश्वासाने सांगितले.
या सभेला महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पठारे यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. तसेच अनेक व्यक्ती, संघटनांनी पाठिंब्याचे पत्र दिले. वडगावशेरी हा मिनी इंडिया असून तो आदर्श करू, अशा भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. मारुती गलांडे यांनी आभार मानले.
या वेळी खासदार लंके म्हणाले, “या परिसराचे परिवर्तन बापूसाहेब पठारे यांनी केले. सर्वांगीण विकास केला. संकटसमयी आधाराचे केंद्र बापूसाहेब पठारे यांनी निर्माण केले. नगरचे नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत. बापूसाहेब पठारे हे सर्वसामान्यांचे आधारवड आहेत. महाराष्ट्रात महविकास आघाडी सत्तेवर येणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. पुढे शेतकरी, महिला, बेरोजगार वर्गासाठी काम करू.’
“प्रतिस्पर्धी उमेदवार खोटे बोलत आहेत. त्यांनी केलेली कामे दाखवावीत. पंधराशे कोटींची कामे केल्याची भाषा वापरू नये. टँकर वापरल्याचा आरोप करणाऱ्यांनी पाण्याचा कधीच प्रश्न सोडवला नाही. आपण जिंकणार आहोत. चांगले परिवर्तन या मतदारसंघात घडवणार आहोत.” – बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काॅंग्रेस-महाविकास आघाडी