पुणे – बापटांना चारीमुंड्या चीत करू

आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी दिले खुले आव्हान

पुणे – “लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी माझा उल्लेख रेवड्यावरच पहिलवान असा केला. पण त्यांना सतपाल आणि हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्या कुस्तीचा इतिहास महिती नसावा. सतपालांना पुण्यात चारीमुंड्या चीत करणाऱ्या हरिश्‍चंद्र बिराजदार हे माझे आदर्श आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सत्तेत राहून मस्तवाल झालेल्या गिरीश बापटांना आम्ही बिराजदारांचा हिसका दाखवून चारीमुंड्या चीत करू,’ असे खुले आव्हान आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी दिले. जोशी यांनी संवाद यात्रेची सांगता केली.

“माझा जन्म खडकमाळआळीतील आहे. माझी जडणघडण चिंचेच्या तालमीत आणि पुणेकरांचा तालमीत झालेली आहे. या निवडणुकीत बापटांना चारीमुंड्या चीत केले नाही तर पुन्हा पुणेकरांसमोर मते मागायला येणार नाही,’ असेही जोशी म्हणाले.

“गेल्या वर्षी पावसाळ्यात धरणे पूर्ण भरलेली असतानाही आपल्याला पुरेसे पाणी केवळ पालकमंत्र्यांमुळे मिळू शकत नसल्याने त्यांना या निवडणुकीत पराभूत केलेच पाहिजे,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष नितीन कदम यांनी केले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाच्या जोरावर पुण्यातून सर्वाधिक मताधिक्‍याने जोशी यांना निवडून देऊ, अशी ग्वाही शिवाजी गदादे पाटील यांनी दिली.

या संवादयात्रेत कॉंग्रेसचे आमदार शरद रणपिसे, आमदार अनंतराव गाडगीळ, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, अश्विनी कदम, प्रिया गदादे, शिवाजी गदादे पाटील, बाळासाहेब दाभेकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सहकारनगर मधील संत गजानन महाराज मठात दर्शन घेऊन जोशी यांनी संवाद यात्रेला प्रारंभ केला. डॉ. आंबेडकर वसाहतीत कार्यकर्ते त्यांना घेऊन गेले. तेथे सर्वांशी संवाद साधल्यावर, मठाच्या समोरच्या बाजूल असलेल्या वसाहतीत जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर दत्तवाडी पोलीस स्टेशन, लक्ष्मीनगर, पर्वतीगावातून संवाद यात्रा जनता वसाहतीत गेली.

राजस्थानी समाजाचा पाठिंबा
राजस्थानचे वनमंत्री सुखराम विष्णोई, जालोर-सुरूही लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार रतन देवासी तसेच जालोर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सबरजित सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बिबवेवाडी येथील नाजूश्री सभागृहात बुधवारी पार पडलेल्या राजस्थान समाजाच्या बैठकीत मोहन जोशी यांना पाठिंबा दर्शविण्यात आला.

पुण्यात राजस्थानी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने पुणे-जोधपूर ही दररोज नवीन रेल्वे, तसेच पुणे-जोधपूर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. या बैठकीला राजस्थान समाजाचे 36-कौमचे सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच अशोक जैन, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, काका धर्मावत, जगदीश उणेचा आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.