पुणे – शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी असलेल्या बंदला महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय रंग चढला. पुण्या-मुंबईत बंद रस्त्याऐवजी सोशल मीडियावर गाजत राहिला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बंदला राजकीय रंग चढल्याबद्दल खंत व्यक्त केली. मागण्या पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी हटू नये अशीही भूमिका त्यांनी मांडली. मोदी सरकारने तीन कृषी विधेयके संसदेत नुकतीच सादर केली. ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करुन पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांची दिल्लीच्या सीमेवर आंदोलने सुरू आहेत.
शेतकऱ्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी 18 पक्ष आणि अनेक संघटना एकत्र आल्या. त्यांनी आजच्या बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये पुण्यातील अलका टॉकिज चौकात जमलेले कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन आले होते. त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झेंडे घेतलेले कार्यकर्ते जास्त दिसत होते. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधातील घोषणा आणि महाविकास आघाडीच्या जयजयकाराच्या घोषणा आंदोलकांमधून ऐकू येत होत्या. पण, “विवाह समारंभाला केवळ पन्नास निमंत्रितांचे बंधन सरकार घालते आणि त्याच सरकारचे लोकं हजारोंच्या संख्येने मोर्चा काढतायत’ अशा प्रतिक्रिया लोकांमधून येत होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकारणच जास्त होत आहे असेही लोकं बोलत होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा फोकस राहिला नाही. उलट आंदोलन विस्कळीत झाले. याचा विचार विरोधी पक्षांना करावा लागेल. विरोधी पक्ष एकत्र आले पण, महाराष्ट्रात ताकदीने आंदोलन रेटू शकले नाहीत. या परिस्थितीचा फायदा भाजपने उठविला आणि सोशल मीडियावरून विरोधकांवर प्रतिहल्ले केले. “मोदी वुईथ फार्मर’ अशी स्लोगन भाजपच्या नेत्यांनी सोशल मीडियावर चालवली.
‘पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचीच धोरणे राबवली आहेत आणि पुढेही राबवतील’ अशी ग्वाही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. “शेतकऱ्यांना फसवणाऱ्या दलालांची बाजू घेत शेतकरी नेते बंद पुकारत आहेत,’ असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. “शिवसेनेला शेतीतले काय कळते?’ अशी जोरदार टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचे एक पत्र भाजपने सोशल मीडियावर व्हायरल केलं. त्या पत्राचे खंडन शरद पवार यांनी मंगळवारी केले.
एकूण काय तर, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरच हा बंद जोरदारपणे गाजला. भाजपच्या नेत्यांनी या प्लॅटफॉर्मचा उपयोग खुबीने आणि आक्रमकपणे करुन घेतला. परंतु, विषय एवढ्यावर संपलेला नाही. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहेच आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे लाक्षणिक उपोषण केले. यातून शेतकरी आंदोलकांचा निर्धार वाढेल.