पुणे – व्हिसीद्वारे केलेल्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजुर केला. टोळी प्रमुखाबरोबर त्याचे कोणतेही गुन्हे केले नसल्यामुळे त्याला मोक्का कायद्याच्या तरतुदी लागू होत नसल्याचा निष्कर्ष नोंदवत न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी हा आदेश दिला.
अंकुश राम गोणते असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. शुभांगी परूळेकर आणि ॲड. अजित पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 2018 मध्ये वारजे येथून एकाचे अपहरण झाले. दोन दिवसांनी त्याचा मृतदेह मुळशी तालुक्यातील रावडे गावात आढळून आला. सावकारी धंद्यातील देवाण-घेवाणातून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
पौड पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. टोळीप्रमुख सुरज ढोकळे याने टोळी स्थापन करून वर्चस्व प्रस्थापित केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणात गोणते याने जामिनासाठी अर्ज केला होता. करोनामुळे उच्च न्यायालयात व्हिसीद्वारे युक्तिवाद सुरू आहे. त्याने गुन्हा केल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा युक्तिवाद ॲड. शुभांगी परूळेकर आणि ॲड. अजित पवार यांनी केला.
त्यानुसार गुन्हा घडताना तो इतर आरोपींबरोबर होता. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच, आरोपीचे कपडे रक्ताने माखले होते. यावरून त्याने केल्याचे सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष काढत उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.