पुणे – करोना प्रतिबंधात फ्रंटलाइन वर्कर असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना लस घेण्यास केलेली टाळाटाळ जीवावर बेतली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचा आकडा 10 वर गेला असून, त्यातील 9 जणांनी लस घेतलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी लगबग सुरू केली आहे.
शहरात फेब्रुवारीपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. मेच्या सुरुवातीपर्यंत या लाटेत शहरात अडीच लाख नागरिक बाधित झाले. त्यातील पालिकेच्या 127 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर, एकाचा मृत्यू झाला. मात्र, मेच्या पहिल्या आठवड्यात अचानक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यूचा आकडा वाढला असून, आणखी 9 जणांचा मृत्यू झाला.
त्यानंतर या मृत्यूंची चौकशी केली असता; यातील 9 कर्मचाऱ्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी मार्चच्या अखेरीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष आदेश काढून तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य इमारतीत लसीकरण केंद्र
कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी महापालिका मुख्य इमारतीत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे. तर शहरातील लसीकरण केंद्रावर गर्दी कमी असताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली.