प्रकल्प चार वर्षांपासून धूळखात अन् पालिकेच्या वेबसाइटवर मात्र “कमिंग सून’
येरवडा – ‘हेरिटेज पार्क’ म्हणून विकसित होणारा प्रकल्प उद्घाटनानंतर पालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर बंद पडला आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर मात्र कमिंग सून असाच फोटो झळकत आहे. प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क, सेंट मीरा कॉलेज येथील पुलाखाली 90 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा हेरिटेज पार्क म्हणजे पुणेकरांच्या पैशांची नासाडी होत असल्याची चर्चा आहे.
माजी नगरसेवक बाबू वागस्कर व नगरसेविका वनिता वागस्कर यांच्या निधीतून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते दि. 18 डिसेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील बंडगार्डनपील, ससून हॉस्पिटल, आगाखान पॅलेस, लष्कराचे दक्षिण मुख्यालय वास्तू, कौन्सिल हॉल, वाडिया कॉलेज, लाल देऊळ, पर्णकुटी, अशा ब्रिटिश काळातील इमारतींच्या प्रतिकृती यामध्ये उभारल्या गेल्या. शहरात येणाऱ्या पर्यटकांना एकाच ठिकाणी शहरातील वास्तू पाहता येतील तसेच पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहलही येथे आणता येईल, या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात होता.
पुणे दर्शनमध्ये या हेरिटेजचा समावेश करावा, असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात सत्ताबदल झाल्यानंतर या प्रकल्पाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी असलेल्या सर्वच प्रतिकृती धुळीने माखल्या आहेत, विद्युत रोषणाई बंद आहे. झाडांचे सुशोभिकरण उखडले असून केवळ माती दिसत आहे.
सुरक्षारक्षकांअभावी या जागेचा वापर सध्या रिक्षा, हातगाडी लावण्यासाठी केला जातो तर, रात्रीच्या वेळी अनेकांचा मुक्काम या ठिकाणी असतो. भंगार वस्तू तसेच जळणासाठी लाकडे येथे पडली आहेत. पालिकेला जर मोठा प्रकल्प उभारून महिन्याभरातच बंद करायचा होता तर लाखो रुपये खर्च कशासाठी केले? असा सवाल स्थानिक नागरिक करू लागले आहेत.
“हेरिटेज पार्क’ची पाहणी केली असून हा प्रकल्प पुन्हा सुरू करणार आहोत. यासाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली असून हा प्रकल्प आता चालविण्यासाठी देणार आहे. जेणेकरून सुरक्षारक्षक ठेवता येईल. ज्या प्रतिकृती आहे त्यात भर घालून त्या सुरक्षित करण्यासाठी टफन ग्लास किंवा फायबर ग्लासचे आवरण करण्यात येईल.
– सुनील मोहिते, पालिका अधिकारी, वारसा व्यवस्थापन विभाग