पुणे – जप्त 350 वाहनांचा होणार लिलाव

‘आरटीओ’ प्रशासनाचा निर्णय : जूनमध्ये करण्याचे निश्‍चित

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर कार्यालयाने परिसरात लावण्यात आलेल्या सुमारे 350 वाहनांचा लिलाव जूनमध्ये करण्याचे ठरविले आहे.

अवैध प्रवासी वाहतूक करणे, परवाना नसणे, वाहनाची नोंदणी नसणे आदी प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या वाहनांवर “आरटीओ’कडून कारवाई करण्यात येते. दंडात्मक कारवाई बरोबरच वाहने जप्त करण्यात येतात. परिणामी कारवाईदरम्यान जप्त केलेल्या वाहनांनी “आरटीओ’ परिसर पूर्ण भरला आहे. यातील काही वाहनांचा लिलाव देखील करण्यात येतो. मात्र, आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर या वाहनांचा लिलाव न झाल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.

वाहनपरवाना, नवीन वाहन नोंदणी यासह विविध कामांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना “पार्किंग’साठी जागा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. कार्यालयाची “पार्किंग’ची जागा कारवाईत जप्त केलेल्या वाहनांनी व्यापली असल्याने नागरिकांनी वाहने कोठे उभी करावीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

मार्चपासून लिलाव “ब्रेक’
जप्त वाहनांची संख्या सुमारे 600 पर्यंत गेली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने गेल्या मार्चपासून या गाड्यांचा लिलाव थांबलेला होता. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने लिलाव प्रक्रियेला गती मिळाली असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. परिसरामध्ये असणाऱ्या वाहनांपैकी सुमारे 350 गाड्यांचा लिलाव जूनमध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये 160 दुचाकी आणि 190 चारचाकी व अन्य वाहनाचा समावेश असल्याचे “आरटीओ’तील अधिकाऱ्यांनी नमूद केले. या लिलावामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)