0 ते 5 वयोगटातील बालकांच्या घरी जाऊन शोध घेऊन उपचार करणार
पुणे – जिल्ह्यात अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 28 मे ते 9 जून 2019 दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी येथे “अतिसार नियंत्रण’ पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये 0 ते 5 वयोगटातील बालकांच्या घरी जाऊन अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना उपचार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली असून, पावसाळ्यांमध्ये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. बाळांना हा त्रास होऊ नये, यासाठी पिण्याचे पाणी शुद्ध असावे. याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा बाल आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर म्हणाले, अतिसार झालेल्या बालकांना झिंक गोळीचा चौदा दिवस उपचार देण्यात येणार आहे. ज्या घरामध्ये पाच वर्षांच्या आतील बालक आहे त्या घरी आशा मार्फत ओआरएस पाकीट मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात “ओआरएस आणि झिंक कोपरा’ तयार करण्यात आला असून, उपकेंद्र आणि अंगणवाडी येथे येणाऱ्या प्रत्येक बालकाच्या परिवाराला अतिसाराबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी आशा, आरोग्य सेविका, आरोग्य सहायक आणि वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार आहेत.
“अतिसार नियंत्रण’ पंधरवड्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी येथे 0 ते 5 वयोगटातील बालकांना सहभागी करून घ्यावे. घरोघरी जाऊन बालकांची पाहणी करून पालकांमध्ये जनजागृती करून जिल्हा अतिसार मुक्त करावा.
– विश्वासराव देवकाते, अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे