पुणे – मास्क न घातल्याने कारवाई केल्याने एकाने पोलिसांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या कारवाईला विरोध करून त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना स्वारगेट येथील जेधे चौकात घडली.
याप्रकरणी गणेश अंकुश मोरे (वय 38 , रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस शिपाई सलमान मुल्ला याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देशभक्त जेधे चौकात गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्त घालत होते. डायमंड हॉटेलजवळ मोरे मास्क न करता थांबला होता.
पोलिसांनी त्याच्यावर मास्क न लावल्याने कारवाई सुरू केली. त्याने कारवाईला विरोध करून पोलिसांना धक्काबुक्की तसेच शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने गाडीतील पेट्रोल स्वत:च्या अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम शेख तपास करत आहेत.