पुणे -पानटपरी चालकाने सिगारेट मोफत न दिल्याने त्याचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर त्याच्या घरावर पेटते गोळे टाकून घर पेटवण्याचाही प्रयत्न केला गेला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
नोमण सय्यद, आत्तु अन्सारी आणि मोठा पणती उर्फ रिझवान अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरिफ सय्यद (33, रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरिफच्या वडिलांची पानटपरी आहे. आरोपींनी सोमवारी रात्री त्यावर दगडफेक करून शिवीगाळ करत सिगारेट मागितली.
लॉकडाऊनमुळे पानटपरी बंद असून, सिगारेट नसल्याचे आरिफच्या वडिलांनी सांगितले. यावर आरोपींनी आरिफच्या वडिलांना शिवीगाळ करत त्यांचा गळा दाबला. यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांना व आईला घेऊन आरिफ रुग्णालयात गेला.
तेव्हा आरोपींनी आरिफच्या घरावर जळते गोळे टाकून घर पेटवण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे घराला आग लागली नाही. आरिफ वडिलांना रुग्णालयातून घेऊन आल्यानंतर घराबाहेर थांबला होता. यावेळी आरोपींनी आरिफला धमकी देत कोयता फिरवला.