पुणे – सिंहगड समन्वय समितीचे समन्वय प्रा.सचिन शिंदे यांचे एका व्यक्तीने अपहरण करण्याचा व त्यांना कोयत्याचा धाक दाखवून भिती घालण्याचा प्रयत्न केला. हि घटना आंबेगाव पठार येथे शनिवारी रात्री साडे आठ घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश दिघे (रा. कात्रज) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रा.सचिन शिंदे (वय 44, रा. आंबेगाव पठार, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे यांना दिघे हा काही दिवसांपासून व्हॉटअसपद्वारे मेसेज पाठवून भेटण्याची इच्छा व्यक्त करीत होता. त्यानुसार, शनिवारी रात्री पावणे सहा वाजता दिघे हा शिंदे राहात असलेल्या सोसायटीमध्ये त्यांना भेटण्यासाठी आला.
दिड तास त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर त्याने बाहेर कारमध्ये बसलेल्या त्याच्या मित्रांना भेटण्याची शिंदे यांना विनंती केली. शिंदे यांनी कारमध्ये डोकावले, तेव्हा दिघेने त्यांना पाठीमागून धक्का मारून कारमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदे यांनी त्यास प्रतिकार करून आरडाओरडा केला. तेव्हा, त्यांच्या सोसायटीतील रहिवासी त्यांच्या मदतीसाठी धावले. दरम्यान, दिघेने त्याच्या कपड्यांमध्ये लपविलेला कोयता बाहेर काढून शिंदे यांना धाक दाखविला, तसेच कोयता हवेत फिरवून तेथून कारमधून पळून गेला.