पुणे – अत्याधुनिक ब्रेकडाऊन व्हॅनबाबात आढावा मागितला

एसटी महामंडळात लवकर अंमलबजावणी होणार

पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या बसेस मार्गावर बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर उपाय म्हणून महामंडळाच्या वतीने नव्याने घेण्यात आलेली सुसज्ज आणि अत्याधुनिक ब्रेकडाऊन व्हॅन महामंडळाला लाभदायी ठरत आहे. त्यामुळे सर्व आगारांसाठी अशा प्रकारची व्हॅन घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी मुख्य कार्यालयाने सर्व आगार प्रमुखांकडून त्याबाबतचा आढावा मागविण्यात आला आहे, त्यानंतर या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाचा मोठा ताफा असला तरीही काही तांत्रिक चुकीचा फटका महामंडळाला सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या बसेस मार्गावर बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, हे बिघाड कमी करण्याचे प्रयत्न महामंडळाच्या वतीने करण्यात येत होते. मात्र, महामंडळाकडे यापूर्वी असलेल्या बस खूप वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. त्यामुळे बसेसचा बिघाड काढण्यासाठी निघालेल्या ब्रेकडाऊन व्हॅनच मार्गावर बंद पडत होत्या. त्याचा त्रास प्रवासी आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाच्या वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यालयाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या, त्याची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांकडे त्याबाबतचा अहवाल मागितला होता. त्याशिवाय ब्रेकडाऊन व्हॅन कशी असावी यासंदर्भात सूचनाही मागविण्यात आल्या होत्या, त्याबाबत सर्व विभागीय कार्यालयांनी तसा अहवाल आणि सूचना पाठविल्या होत्या.

त्यानुसार गेल्या महिन्यात मुख्य कार्यालयात पन्नास ब्रेकडाऊन व्हॅन दाखल झाल्या आहेत. या व्हॅनची मुंबई येथील विभागीय कार्यालयात चाचणी घेण्यात आली. या बसेस लहान असल्याने त्या गर्दीमध्येही ठराविक कालावधीत मार्गावर पोहोचत असल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले आहे. त्याशिवाय एखाद्या बसेसमध्ये झालेला बिघाडही तात्काळ निघत असल्याचे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अशा आणखी व्हॅन घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, त्यानुसार राज्यभरातील सर्व आगारांना अशा प्रत्येकी एक व्हॅन देण्यात येणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास या व्हॅनमध्ये वाढही करण्याचा गांभीर्याने विचार करण्यात येत आहे, अशी माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.