पुणे : शिवीगाळ आणि डोक्यात विट मारून हातात कोयता फिरवून दहशत निर्माण करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. जतिन संतोष पवार (वय १९, रा. धायरीगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत विशाल गणेश स्थानिक यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. शनिवारी (ता. २५) संध्याकाळी सात वाजता फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरासमोर मोबाईल पाहत बसले होते. त्यावेळी त्यांच्या तोडओळखीचा कुलदीप सोनावणे व त्यांचा मित्र बबल्या गायकवाड यांनी फिर्यादी यांना विनाकारण आई वडीलांवरून शिवीगाळ करून लाथा बुक्कांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादींचे भाऊ सागर यांच्या डोक्यात विट मारुन हातात कोयता फिरवून दहशत निर्माण केली होती. याबाबत जतिन व त्याचे साथीदारांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
जतिन व त्याचे साथीदार हे गणेश पेठेतील दगडी नागोबा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जतिन आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलिस अंमलदार दत्ता सोनावणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, अशोक माने, अजय जाधव, विजयसिंग वसावे, शशिकांत दरेकर, आय्याज दड्डीकर, अजय थोरात, इम्रान शेख यांनी ही कारवाई केली.