पुणे : गोंधळानंतर लष्कर पोलीस भरती सुरळीत

ओळखपत्र नसल्याने लष्कर प्रशासनाने नाकारला प्रवेश

पुणे – लष्कर पोलीस भरतीसाठी आलेल्या अनेक इच्छुक मुलींकडे ओळखपत्र नसल्याने लष्कर प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला. यामुळे नाराज मुलींनी घोषणाबाजी करत प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांना समजावून परत पाठवण्यात आले. हा प्रकार हडपसर येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग सेंटर (एआयपीटी) येथे मंगळवारी सकाळी साडेआठपासून सुरू होता.

या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तिन्ही राज्यांतून 17 ते 21 वर्षे वयोगटातील हजारपेक्षा अधिक मुली मंगळवारी (दि.12) पुण्यात दाखल झाल्या. लष्करातर्फे या भरतीसाठी 27 जुलै ते 31 ऑगस्टदरम्यान अर्ज मागवण्यात आले होते.

हे अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवाराला नोंदणी केलेल्या ई-मेलवर प्रवेशपत्र पाठवण्यात येणार असल्याचे जाहिरातीत म्हटले होते. तसेच वारंवार आवाहन केले जात होते. मात्र, तरीही ही सैन्य भरती खुली असल्याचा गैरसमज झाल्याने भरपूर मुली अर्ज न भरता येथे आल्या. यातील काहींनी अर्ज भरले होते, परंतु त्यांना प्रवेश पत्र मिळाले नाही. तरीसुद्धा भरतीची महत्त्वकांक्षा बाळगत त्या आल्या होत्या.

यामध्ये अमरावती, कुर्रा, उस्मानाबाद, वाशीम, हिंगोली, तुळजापूर आदी ठिकाणच्या मुलींचा समावेश होता. ज्या मुलींकडे भरतीसाठी लष्कराचे आवश्‍यक प्रवेशपत्र नव्हते, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नाराज मुली आणि त्यांच्या पालकांनी गेटसमोर निदर्शने करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, वानवडी पोलिसांनी येथे मुलींना मार्गदर्शन करत त्यांना परत पाठवले. या गोंधळानंतर लष्करी भरती प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली.

पुढील दोन दिवस भरती प्रक्रिया सुरू असून, अर्ज केल्यानंतर ज्या मुलींना त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर प्रवेशपत्र मिळाले आहे, त्यांनीच सैन्यभरती साठी यावे.
– सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक, वानवडी 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.