पुणे : लॉकडाऊनच्या नव्या आदेशाबाबत तुमचाही झालाय घोळ? तर ‘ही’ यादी वाचाच

पुणे – राज्यशासनाच्या आदेशानुसार शहरात सुधारित करोना प्रतिबंधात्मक नियम महापालिका आयुक्तांनी लागू केले आहेत. या आदेशानुसार आता अत्यावश्‍यक सेवा वगळता जवळपास पूर्णत: संचारबंदी असेल. या काळात कोणत्या सेवा सुरू आणि कोणत्या बंद, तसेच पुढील काही दिवसांत कोणत्या सेवांना मान्यता दिली जाईल, लसीकरणासाठी अत्यावश्‍यक सेवांसाठी नियमावली, वाहतूक नियमावली जाहीर केली आहे.

या सेवा असतील अत्यावश्‍यक सेवा
रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्‍लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसी व फार्मा कंपनी, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई व खाद्यपदार्थांची दुकाने सार्वजनिक वाहतूक -सार्वजनिक बस, टॅक्‍सी, रिक्षा, रेल्वे, वेगवेगळ्या देशांचे राजदूत व त्यांचेशी संबंधित कार्यालये, पूर्व पावसाळी नियोजित कामे स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई-कॉमर्स, मान्यता प्राप्त मीडिया, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित केलेल्या अत्यावश्‍यक सेवा.

उद्याने राहणार सुरू
महानगरपालिका क्षेत्रात सर्व उद्याने-सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत संपूर्णतः बंद राहतील. ठिकाणी वावरताना सामाजिक अंतर व स्वच्छतेबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल.

इतर दुकाने बंद
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व मॉल ( अत्यावश्‍यक सेवा वगळून ) संपूर्णतः बंद राहतील. अत्यावश्‍यक सेवा-वस्तूंचे दुकानाच्या ठिकाणी वावरताना नागरिकांनी सामाजिक अंतर व स्वच्छतेबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन बंधनकारक आहे. दुकानात गर्दी होऊ नये, यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा कक्षामध्ये थांबण्यासाठी नियोजन करावे. अत्यावश्‍यक सेवा / वस्तूंचे दुकानाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण तातडीने करून घ्यावे. सदर आस्थापनांनी करोनासंदर्भात सुरक्षा उपाययोजना म्हणून पारदर्शक काच अथवा इतर साहित्यांचे कवच तसेच ऑनलाइन पेमेंटद्वारे ग्राहकांशी कमीतकमी संपर्क येईल, याप्रमाणे कार्यवाही करावी.

फक्त हीच कार्यलये राहतील सुरू
शहरातील सर्व बॅंका, विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनी दूरसंचार सेवा पुरवठादार, विमा/ मेडिक्‍लेम कंपनी, औषध उत्पादन करणारे आस्थापना व त्यासाठी लागणारे साधन सामग्री उत्पादक तसेच त्याच्याशी संबंधित कार्यालये आयटी/ आयटीइएस कंपनी ( सर्व्हर व इतर अत्यावश्‍यक काम ) वकील, सी.ए यांची कार्यालये, वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये यांचा समावेश आहे. या शिवाय सर्व शासकीय कार्यालये 50% उपस्थितीत सुरू राहतील. मात्र, करोनासंबंधित कामकाज करणाऱ्या आस्थापना 100% क्षमतेने सुरू ठेवणेबाबत निर्णय संबंधित आस्थापना प्रमुख घेतील. सर्व शासकीय कार्यालय तसेच विद्युत, पाणीपुरवठा क्षेत्राशी संबंधित शासकीय कंपन्या, बॅंकिंग व इतर वित्तीय सेवा संबंधित शासकीय कंपन्या संपूर्ण क्षमतेने सुरू राहतील.

सभागृहे बंदच, शुटिंगला परवानगी
नाट्यगृह, मनोरंजन पार्क, ऍम्यूजमेंट पार्क/ऑर्केड्‌स, व्हिडिओ गेम, पार्लर, वॉटरपार्क, स्विमिंगपूल, व्यायामशाळा (जिम), क्रीडा संकुल, क्‍लब इ. आस्थापना संपूर्णतः बंद राहतील. चित्रपट, मालिका, जाहिरातीचे शुटिंग करण्यासाठी परवानगी असेल. कलाकार व कर्मचारी यांनी 15 दिवसांची वैधता असणाराकरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

शहरात हे राहणार पूर्ण बंद
हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट बंद असेल. तर पार्सल सेवा, घरपोच सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू असेल. शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत फक्त घरपोच सेवेकरिता परवानगी राहील. मात्र हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्याची सुविधा असणार नाही. हॉटेलमधिल रेस्टॉरंट / बार हे रूम सर्विससाठी खुले राहतील. परंतु, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध राहील. पार्सल सेवा वरीलप्रमाणे देता येईल. येथील ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी 15 दिवसांची वैधता असणारा कोविड -19 निगेटिव्ह सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. तसे नसल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे.

शाळा महाविद्यालये बंद… परीक्षा होणार
सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पूर्णतः बंद राहतील. इयत्ता 10वी व 12वी ची परीक्षा असल्यामुळे त्यांना यातून वगळण्यात येत आहे. मात्र ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील. परीक्षेशी संबंधित सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलेले असावे. अथवा 48 तास वैधता असणारा करोना निगेटिव्ह सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. सर्व प्रकारचे कोचिंग क्‍लासेस पूर्णतः बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम, सभा संमेलने व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.

लग्न समारंभास मर्यादित उपस्थिती
लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील. मंगल कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलेले असावे. अथवा कोविड – 19 निगेटिव्ह दाखला सोबत बाळगणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी रक्कम रुपये 1000/- व संबंधित आस्थापनावर रक्कम रुपये 10000/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तर अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीस परवानगी राहील.

खाद्यपदार्थ स्टॉलला पार्सलला मुभा
रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल (टपऱ्या) येथे अन्न पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. फक्त पार्सल घेऊन जाण्यास सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत परवानगी राहील. सदर ठिकाणी येणाऱ्या नागारिकांना सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल. या व्यावसायिकांनाही 15 दिवसांची वैधता असणारा कोविड – 19 निगेटिव्ह दाखला सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

उत्पादन क्षेत्र सुरूच राहणार
उत्पादन क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरू राहील. सदर ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. आस्थापनांनी प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांचा ताप तसेच ऑक्‍सिजनची पातळी तपासणे बंधनकारक असेल. एखादा कामगार करोना बाधित आढळल्यास त्यांच्याशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने विलगीकरण करण्यात यावे. 500 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनांनी त्याने स्वतःचे क्वारंटाइन सेंटर सुरू करावेत. एखादा कामगार कोरोना बाधित आढळल्यास संपूर्ण युनिट बंद ठेऊन तातडीने सॅनिटाइज करावेत. चहा व जेवणाच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे. त्यासाठी कामगारांचे लसीकरण करून घ्यावे.

80% ऑक्‍सिजनचा पुरवठा रुग्णालयांनाच
दिनांक 10 एप्रिलपासून औद्योगिक कंपन्यांना ऑक्‍सिजनचा म्हणून वापर कच्चा माल म्हणून करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. जर, एखाद्या कंपनीला या बाबतचा वापर करावयाचा असल्यास त्यांनी योग्य त्या कारणासह लायसनसिंग ऍथोरिटी यांची मान्यता घ्यावी. त्यांनी संबंधित कंपन्यांनी सदरची प्रोसेस थांबवावी, अथवा रीतसर परवानगी घेण्याबाबत नियंत्रण ठेवावे. सर्व ऑक्‍सिजन प्रोड्युसर कंपन्यांनी 80% ऑक्‍सिजनचा पुरवठा हा फक्त वैद्यकीय कारणासाठी करावा. त्यांनी ऑक्‍सिजनचा वापर करणारे आणि ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्यांची यादी 10 एप्रिलपर्यंत प्रसिद्ध करावी.

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी
को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत 5 पेक्षा जास्त करोनाबाधित आढळल्यास सदर सोसायटी ही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सहायक आयुक्त घोषित करतील. बाहेरील व्यक्तींना सोसायटीमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध राहील. यासंबंधित फलक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावे. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राशी संबंधित सर्व नियमांचे सोसायटीने काटेकोरपणे पालन करावे. तसेच नियमांचे पालन होते किंवा नाही याकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायटीवर
रक्कम 10 हजार रुपये आकारून याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

ही बांधकामे राहणार सुरू
ज्या बांधकामांच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे, असे बांधकाम सुरू ठेवता येईल. कामगारांनी बांधकामाशी निगडीत साहित्य ने-आण करणेकरिताच बाहेर पडावे. सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित आस्थापनावर रक्कम रुपये 10 हजार रुपये- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तोपर्यंत कोविड – 19 निगेटिव्ह असल्याचा दाखला बाळगणे अनिवार्य आहे. एखादा कामगार करोना बाधित आढळल्यास त्यांना पगारी वैद्यकीय रजा देण्यात यावी. त्याची सेवा खंडित करण्यात येऊ नये.

प्रवासी वाहनांना 9 एप्रिलनंतर मुभा
रिक्षा, टॅक्‍सी, कॅब, चारचाकी स्वयंचलित वाहन यांना 9 एप्रिपासून नियम लागू राहतील. त्यात, रिक्षाचालक + 2 व्यक्ती, टॅक्‍सी / कॅब / चारचाकी स्वयंचलित वाहनचालक + आसन क्षमतेच्या 50% आसन क्षमता. प्रवासात मास्क वापरणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास 500 रु. याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. चारचाकी वाहनात प्रवाशांद्वारे मास्कचा वापर बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास चारचाकी वाहन चालक आणि प्रवासी यांना प्रत्येकी 509 रु. दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व इतर कर्मचारी यांनी लवकर लसीकरण करून घ्यावे. तोपर्यंत 15 दिवसांची वैधता असणारा कोविड – 19 निगेटिव्ह सर्टिफिकेट सोबत बाळगणे अनिवार्य आहे. परंतु, जर चालकाने प्लॅस्टिक शीट लावल्यास त्यांना या दाखल्याची आवश्‍यकता राहणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.