विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : पुणे शहरातील काही प्रभागात चारपेक्षा जास्त लसीकरण केंद्र सुरू आहेत. मात्र खराडी-चंदननगर प्रभागात फक्त एकच लसीकरण केंद्र महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू होते. पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे विनंती करून देखील नवे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत नव्हते. या भागातील नागरिकांची लसीकरण केंद्र शोधण्यासाठी होणारी परवड दूर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून नवीन लसीकरण केंद्र मंजूर करून घेण्यात आली आहेत. सर्व केंद्र लवकरच सुरू होतील असे नगरसेवक अॅड. भैय्यासाहेब जाधव यांनी सांगितले.
यासाठी नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका संजिला पठारे, नगरसेविका सुमन पठारे, यांनी देखील पाठपुरावा केल्यामुळे नवीन लसीकरण केंद्रांना मंजुरी मिळविण्यात यश आले आहे. किमान एका नगरसेवकांच्या मागणीवरून प्रभागात एका ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून प्रभागातील अहिल्यादेवी होळकर सभागृह(तुकारामनगर), हंबीरराव मोझे मनपा शाळा(चंदननगर), बहुउद्देशीय हॉल(तुळजाभवानीनगर) या तीन ठिकाणी लसीकरण केंद्र मंजूर करण्यात आली.
सदर लसीकरण केंद्र लवकरच सुरू होणार आहेत. सध्या याविषयी प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता चालू आहे. नव्याने मंजुरी मिळालेली तीन व खराडी ओपीडी याठिकाणी पूर्वीपासून सुरू असलेले एक अशी एकूण चार केंद्रामधून प्रभागातील नागरिकांना लसीकरण घेता येणार आहे.
याव्यतिरिक्त खुळेवाडी भागासाठी देखील स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या केंद्राबाबतसुद्धा सकारात्मक निर्णय होऊन तेही लवकरच सुरू व्हावे, यासाठी प्रभागातील चारही लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे नगरसेवक अॅड.भैय्यासाहेब जाधव यांनी सांगितले.