पुणे – डी.एल.एड.च्या प्रवेशासाठी करा अर्ज

16 जूनपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत; प्रवेशाच्या 3 फेऱ्या होणार

पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने राज्यातील प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी (डी.एल.एड.) ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी येत्या 16 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

विद्या प्राधिकरणाने बारावीच्या निकालानंतर तत्काळ सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाच्या डी.एल.एड.च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मान्यताप्राप्त सर्व शासकीय व अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित सर्व माध्यमांच्या अध्यापक विद्यालयांमधील प्रवेशासाठी विद्या प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याचे टप्पे, नियमावली, अर्ज पडताळणी केंद्राची यादी, महत्त्वाच्या सूचना, अध्यापक विद्यालयांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात येणार आहे. शासकीय व व्यवस्थापन कोटा यासाठी स्वतंत्रपणे प्रवेश प्रक्रिया होणार आहे. प्रथम वर्षातील अभ्यासक्रम 17 जुलैपासून सुरू होणार आहे.

उमेदवारांनी पडताळणी केंद्रावर ऑनलाइन अर्जाची पडताळणी करून घेण्यासाठी 17 जून हा दिवस देण्यात आला आहे. उमेदवारांनी किमान तीन व जास्तीत जास्त पाच विद्यालयांची नावे प्राधान्याने अर्जात नोंदविणे आवश्‍यक आहे. पूर्ण भरलेल्या अर्जाची छाननी व गुणवत्ता यादी संकेतस्थळावर 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 24 जून रोजी प्रवेशाची प्रथम फेरी जाहीर होणार आहे. दुसऱ्या फेरीत विद्यालयांचा विकल्प देण्यासाठी 28 जून ही तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. तिसऱ्या फेरीसाठी विकल्प देण्यासाठी 5 जुलै ही तारीख ठरविण्यात आली आहे. या अंतिम फेरीची यादी 7 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या उमेदवारांना प्रवेश घेण्यासाठी 8 ते 11 जुलैपर्यंत मुदत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.