पुणे – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भोसरी येथील सभेत गोंधळ घालत कर्तव्यावरील महिला शिपायास शिवीगाळ करणार्याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी फेटाळला. रुतीक लांडगे असे त्याचे नाव आहे. याबाबत महिला पोलीस अंमलदाराने भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी लांडगे याच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या जनसमुदायासमोर अश्लील व असभ्य वर्तन केले आहे.
अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरीकेट अनधिकृतपणे ओलांडुन व्यासपीठाच्या दिशेने जात असताना कर्तव्यावरील महिला पोलीस अंमलदाराने रोखण्याचा प्रयत्न केला असता हा गुन्हा घडला आहे.
अतिमहत्वाच्या व्यक्तिजवळ अनधिकृतपणे पोहोचुन त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करण्याचा आरोपीचा उद्देश होता अगर कसे याबाबत सविस्तर तपास करायचा असल्याने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी अॅड. बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
१७ नोव्हेंबर २०२४ रोजी भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होती. यावेळी, फिर्यादी त्याठिकाणी कर्तव्य बजावत होत्या. सभास्थळी आलेला आरोपी बॅरिकेटवरून चढून जात असताना फिर्यादी यांनी त्यांना रोखले.
यावेळी, त्याने फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात अश्लील शेरेबाजी करून मनास लज्जा निर्माण होईल असे वक्तव्य केले. याखेरीज, आरोपीसह त्याच्या अन्य साथीदाराने अश्लील हातवारे करीत काही तरी बोलत जोर जोरात हसून निघून गेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.