पुणे – अरविंद शिंदे यांना अटकपूर्व जामीन

पुणे – अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना मंगळवारी तात्पुरता जामीन मंजूर झाला आहे. सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी जामीन मंजूर केला. तर नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी अद्याप जामिनासाठी अर्ज केलेला नाही.

याबाबत आयुक्त निंबाळकर यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार शिंदे आणि धंगेकर यांच्यासह 15 ते 17 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून शिंदे यांनी अॅड. विजयसिंह ढोंबरे पाटील, अॅड. रुपाली पाटील, अॅड. हितेश सोनार आणि अॅड. पुष्कर पाटील यांच्यामार्फेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जलपर्णी काढण्यासाठीच्या निविदांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मला चोर आणि भ्रष्टाचारी म्हणण्याची त्यांची लायकी आहे का? असे विधान केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे असे बोलून त्यांनीच जमाव भडकावला. शिंदे यांनी वैयक्तिक कोणाला मारहाण केलेली नाही. तसेच सरकारी कामात अडथळा आणला नाही, असा युक्तिवाद अॅड. विजयसिंह ढोंबरे-पाटील यांनी केला. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने शिंदे यांना पासपोर्ट जमा करण्याच्या आणि दर मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. दरम्यान, शिंदे यांच्या अर्जावर पोलिसांना 27 फेब्रुवारी रोजी बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पाषाण आणि कात्रज येथील तलावांमध्ये जलपर्णी नसतानाही 23 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याची टीका करून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी महापौरांच्या दालनात आंदोलनाचा पवित्रा घेतला. महापौरांनी आंदोलकांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना फोन करून आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यावेळी निंबाळकर यांनी निविदेबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. ही निविदा जादा दराने आल्याने ती रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. त्या दरम्यान धंगेकर यांनी निंबाळकरांना उद्देशून चोर आणि भ्रष्टाचारी म्हटले. त्यावर निंबाळकर यांनीही धंगेकर यांच्याकडे बोट करून मला चोर, भ्रष्टाचारी म्हणण्याची त्यांची लायकी आहे का? असे विधान केले. त्यानंतर झालेल्या वादात निंबाळकर यांना धक्काबुक्की झाली, अशी फिर्याद देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)