पुणे – पती व पत्नीत काैटुंबिक कारणावरून वादविवादाचे प्रसंग वारंवार घडतात. मात्र, पुण्यात एक वेगळ्याच कारणातून पत्नीने पतीला बेदम मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार घडला. माेड आलेले हरभरे खाल्ल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला लाटण्याने, तसेच डाेक्यात मिक्सरचे भांडे मारून जखमी केले. याशिवाय हाताची करंगळी जाेरात चावून नखही ताेडले. याप्रकरणी पतीने पत्नीविराेधात थेट पाेलिसांत तक्रार दिली आहे.
साेनाली अमाेल साेनवणे (४०) असे पत्नीचे नाव असून, पीडित पती अमाेल गुलाबराव साेनवणे (४४, रा. साेमवार पेठ, पुणे) याने समर्थ पाेलिसांत तक्रार दिली आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमाेल यांनी स्वयंपाकघरात माेड आलेले काही हरभरे खाल्ले. त्यावरून पत्नीने चिडून शिवीगाळ करत लाटण्याने मारहाण केली.
नखांनी चेहऱ्यावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे, पाेटाला उजव्या बाजूस ओरखडून जखमी केले. अमोल यांनी लाटणे हिसकावून घेतल्यावर सोनाली यांनी मिक्सरचे भांडे उचलून पतीच्या डाेक्यात दाेनदा मारले. उजव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन दुखापत केली. घटनेची माहिती मिळताच समर्थ पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पतीकडून पत्नीला मारहाण
दुसऱ्या घटनेत उत्तमनगर परिसरात पायगुडे चाळ येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील ३२ वर्षीय पत्नीने पतीच्या रिक्षाचे हप्ते भरले. मात्र, हप्ते मला न सांगता का भरले, याचा राग धरून पतीने पत्नीला शिवीगाळ करत पाेटावर लाथ मारून तिला खाली पाडले. याशिवाय लाटण्याने तिच्या डाेक्यावर मारून दुखापत केली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीनंतर उत्तमनगर पाेलिसांनी पती इम्तियाज नजित कुरेशी (३६) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.